मुंबई :
कोरोनामुळे वारंवार बंद करण्यात येत असलेल्या शाळा अखेर सोमवारपासून पुन्हा सुरू झाल्या. मुंबईमध्ये पहिली ते बारावीपर्यंत सोमवारपासून सुरू झालेल्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. मुंबईतील १६ लाख ३५ हजार ३७० विद्यार्थ्यांपैकी तब्बल ७ लाख २० हजार ९२ विद्यार्थी म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी शाळेमध्ये हजेरी लावली. शाळेमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने ४ ऑक्टोबरपासून ८ ते १२ तर १५डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याने अवघ्या काही दिवसांत राज्यातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र मागील दोन आठवड्यांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असल्याने राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी पालकांकडून होऊ लागली होती. पालकांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारने २४ जानेवारीपासून राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये पहिली ते बारावीच्या वर्गामध्ये १६ लाख ३५ हजार ३७० विद्यार्थी आहेत. त्यानुसार पालकांची संमती घेऊन सुरू झालेल्या या वर्गांमध्ये सोमवारी ७ लाख २० हजार ९२ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. यामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी संलग्न असलेल्या पहिली ते बारावीच्या १७७४ शाळांपैकी १७३१ शाळा पहिल्या दिवशी सुरू झाल्या. या शाळांमधील ९ लाख ८२ हजार ८६० विद्यार्थ्यांपैकी ५ लाख २६ हजार ४५२ विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली. तर ३४ हजार ४८६ शिक्षकांपैकी ३१ हजार ३५३ शिक्षक उपस्थित होते. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेशी संलग्न असलेल्या पहिली ते दहावीच्या २२६९ शाळांपैकी २११९ शाळा सुरू झाल्या. या शाळांमधील ६ लाख ५२ हजार ५१० विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९३ हजार ६४० विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली. मात्र पालिकेच्या शाळेतील २ लाख ९७ हजार ४६७ विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमती पत्र लिहून दिले आहे. तसेच १८ हजार ६७ शिक्षकांपैकी १७ हजार ६४३ पालिकेतील शिक्षक शाळांमध्ये उपस्थित होते.