मुंबई :
कोणाला काहीच न सांगता आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलासह आई कुर्ला येथील घरातून बाहेर पडली. त्यानंतर तब्बल दोन दिवसाने आई आणि मुलाचा मृतदेह चेंबूरच्या लाल डोंगर परिसरातील नाल्यात सापडला. या घटनेने चेंबूरसह कुर्ल्यामध्ये खळबळ उडाली आहे.
कुर्ला पूर्वेकडील कामगार नगर येथे राहत असलेली श्रुती यशराज महाडिक (३६) ही 12 जानेवारी रोजी दुपारी घरात कोणालाच काहीही न सांगता आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाला घेऊन घरातून बाहेर पडली. आई व बाळ घरात दिसत नसल्याने घरातील लोकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र दोघेही कुठेच दिसून न आल्याने त्यांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात मायलेक हरवल्याची तक्रार दाखल केली. नेहरू नगर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या फुटेजच्या माध्यमातून या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता श्रुती चेंबूरमधील लालडोंगर परिसरात जात असल्याचे दिसले. लाल डोंगर परिसर म्हणजे श्रुतीचे माहेर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यावर पोलिसांनी तिच्या माहेर या लोकांची चौकशी केली. त्यावेळी श्रुती घरीच आली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तिच्या माहेरच्या इमारतीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये ती इमारतीच्या आत जाताना दिसली, मात्र बाहेर पडताना दिसत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी तिचा आसपासच्या परिसरात शोध घेतला. त्यावेळी इमारत आणि डोंगरामधील नाल्यात शुक्रवारी दोघांचे मृतदेह सापडले.
श्रुती माहेरी आली, परंतु घरी न जाता इमरतीच्या गच्चीवरून मुलासोबत उडी घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी विद्याविहार येथील राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे. नेहरू नगर पोलिसांकडे पुढील तपास सोपवण्यात आला आहे. श्रुतीच्या वडिलांचा जबाब नोंदवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.