मुंबई :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २३ जानेवारी रोजी होणार असून प्रवेशपत्र ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात येणार आहे. या प्रवेशपत्रावरील नमूद केंद्रावरच उमेदवारांना परीक्षा देता येणार आहे.
एमपीएससीची २ जानेवारी रोजी परीक्षा आता २३ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. या संबंधित वेळापत्रक आयोगाकडून अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे काहींची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे. अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवरील उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. परीक्षा कक्षेत प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणत्रत्र सोबत आणणे अनिवार्य आयोगाने म्हटले आहे. मूळ प्रवेश प्रमाणपत्राशिवाय उमेदवारांना परीक्षेस प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून प्रवेश पत्र मिळण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्यास तातडीने आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.