मुंबई
दोन्ही हात-पाय गमावलेल्या (क्वाड्रॅपल अँप्युटी) व केवळ कृत्रिम अवयवांनिशी चालू-फिरू शकणार्या दोन रुग्णांवर मुंबईमधील परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये पार पडलेल्या बायलॅटरल हॅण्ड ट्रान्सप्लान्टच्या (दोन्ही हातांचे प्रत्यारोपण) यशस्वी शस्त्रक्रियेनंतर या रुग्णांना हातांची एक नवी जोडी मिळाली आहे. दोन्ही हात-पाय गमावलेल्या रुग्णांवर दोन्ही हातांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडण्याची हस्त प्रत्यारोपणाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. राजस्थानातील एक २२ वर्षीय होतकरू कबड्डी खेळाडू आणि अकाउंटटंपदी काम करणार्या पुण्याच्या ३३ वर्षीय व्यक्तीवर या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
राजस्थानच्या अंतर्भागातील एका खेड्यात राहणारा २२ वर्षांचा होतकरू कबड्डीपटू जगदेव सिंग याला २० महिन्यांपूर्वी जानेवारी २०२० मध्ये विजेचा धक्का बसला होता व या अपघातामध्ये झालेल्या गँगरीन व जंतूसंसर्गामुळे त्याचे दोन्ही हात आणि पाय कापून टाकावे लागले. ज्या वर्षी जगदेव सिंग कबड्डी अकॅडमीमध्ये प्रवेश घेणार होता, त्याचवर्षी त्याला अपघातामध्ये आपले हातपाय गमवावे लागले. मात्र १५ ऑक्टोबर २०२१ रोजी, दसर्याच्या दिवशी अहमदाबादमध्ये एका व्यक्तीच्या हातांची एक जोडी अवयवदानामध्ये उपलब्ध होत असल्याचा फोन त्यांना हॉस्पिटलमधून आला. सिंग याच्या कुटुंबियांसाठी ही बातमी म्हणजे एक चमत्कारच होता. प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ, हात व मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जन्स, ऑर्थोपेडिक सर्जन्स आणि अॅनेस्थेशियोलॉजिस्ट्स यांच्या एका मोठ्या पथकाने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडली. तब्बल १३ तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची स्थिती पूर्ववत होण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. नव्याने बसविलेल्या हातांना सांभाळत कृत्रिम पायांवर उभे राहताना शरीराचा तोल सांभाळण्याचे आणि चालण्याचे तंत्र सिंग याला नव्याने शिकून घ्यावे लागणार होते यासाठी फिजिओथेरपिस्ट्सच्या एका पथकाने प्रचंड कष्ट घेतले.
दुसर्या बाजूला पुण्यातील ३२ वर्षीय पुरुष रुग्ण प्रकाश शेलार यांनाही २०१९ च्या दिवाळीमध्ये विजेचा धक्का बसून झालेल्या अपघातामध्ये आपले हात-पाय गमवावे लागले. व्यवसायाने अकाउंटन्ट असलेले शेलार हे आपले आईवडील, पत्नी आणि ४ व २ वर्षांची दोन लहान मुले अशा सहा जणांच्या कुटुंबातील अर्थार्जन करणारे एकमेव सदस्य होते. या दु:खद घटनेमुळे त्यांना नोकरी गमवावी लागली व आपल्या प्राथमिक गरजांसाठीही आता ते आपल्या कुटुंबावर अवलंबून आहेत. त्यांची पत्नी आणि आई कुटुंबाला आधार देण्यासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी लहान-मोठी कामे करत आहेत. ९ महिन्यांपूर्वी त्यांनी डॉ. निलेश सातभाई यांची भेट घेतली व हस्तप्रत्यारोपणासाठी प्राप्तकर्त्यांच्या प्रतीक्षायादीमध्ये आपले नाव नोंदवले. ३० ऑक्टोबर २०२१ रोजी दिवाळीच्या अगदी काही दिवस आधीच त्यांना सुरत येथून अवयवदानाद्वारे हात उपलब्ध झाल्याची सूचना मिळाली. ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर दोन्ही हातांच्या प्रत्योरोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ऑगस्ट २०२० मध्ये मोनिका मोरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया ही पश्चिम भारतातील बायलॅटरल हॅण्ड ट्रान्सप्लान्टची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया ठरली होती व डॉ. निलेश सातभाई यांच्या समर्पित पथकाने ही शस्त्रक्रिया पार पाडली होती.