Voice of Eastern
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमी

वरिष्ठ महिला गट राज्य अजिंक्यपद निवड स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मुंबई शहर, मुंबई उपनगर

banner

मुंबई :

यजमान परभणीसह रत्नागिरी, कोल्हापूर, औरंगाबाद यांनी ‘६८व्या वरिष्ठ महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेची’ उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर यांनी थेट उपांत्यपूर्व फेरी गाठली.

परभणी-पाथरी येथील कबड्डीमहर्षी बुवा साळवी क्रीडागरीत झालेल्या उपपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यजमान परभणीने बलाढ्य ठाण्याला ४१-३३ असे रोखले. सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत खेळणार्‍या परभणीने मध्यांतराला २३-१५ अशी भक्कम आघाडी घेतली होती. नंतर सावध पवित्रा घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. निकिता व कोमल लंगोट भगिनी आणि गौरी दहे यांचा झंजावाती खेळामुळे परभणीने हा विजय ८गुणांनी साकारला. ठाण्याकडून चंद्रिका जोशी, माधुरी गवंडी यांनी उत्तम खेळ करीत सामन्यात चुरस निर्माण केली, पण ठाण्याला विजय मिळवून देण्यात त्या अपयशी ठरल्या. दुसर्‍या सामन्यात रत्नागिरीने रायगडचा प्रतिकार ३६-२५ असा मोडून काढला. विश्रांतीला रत्नागिरीकडे १९-१४ अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली होती. समरीन व तसरीम या बुरोंडकर भगिनी या विजयात चमकल्या. रचना म्हात्रे, तेजा सपकाळ यांचा चतुरस्त्र खेळ रायगडला पराभवापासून वाचवू शकला नाही.

रत्नागिरीचा बचाव भेदून हनुमान उडी घेताना रायगडची चढाईची खेळाडू.
रत्नागिरीचा बचाव भेदून हनुमान उडी घेताना रायगडची चढाईची खेळाडू.

कोल्हापूरने सोलापूरचा ६५-३७ असा सहज पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्नेहा शिंदे, पूजा जोशीलकर यांच्या नेत्रदीपक खेळामुळेच कोल्हापूरने २८गुणांच्या मोठ्या फरकाने हा सामना आपल्या नावे केला. कोल्हापूरने मध्यांतरालाच ३०-१७ अशी आघाडी घेत विजयाचा पाया रचला. काजल गायकवाड, पूजा आदलिंगे सोलापूरकडून बर्‍या खेळल्या. शेवटच्या चुरशीच्या लढतीत औरंगाबादने धुळ्याचा प्रतिकार २७-२४ असा संपुष्टात आला. मध्यांतराला दोन्ही संघ १०-१० असे बरोबरीत होते. तृप्ती अंधारे, स्वाती ढगे यांच्या संयमी खेळाला या विजयाचे सारे श्रेय जाते. धुळ्याकडून ज्योती डफळे, आरती पाटील यांनी उत्कृष्ट खेळ करीत सामन्यातील रंगत कायम ठेवली. पण शेवटच्या क्षणी त्याचे विजयात रूपांतर करण्यात त्या अपयशी ठरल्या.

सकाळी झालेल्या सत्रातुन या संघांनी बाद फेरी गाठली. अ गटातून पुणे, धुळे, ब गटातून मुंबई शहर, रायगड, क गटातून मुंबई उपनगर, सोलापूर, ड गटातून पालघर, ठाणे, इ गटातून परभणी, औरंगाबाद, फ गटातून कोल्हापूर, रत्नागिरी यांनी ‘६८व्या वरिष्ठ महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी’ स्पर्धेची बाद फेरी गाठली होती.

Related posts

रक्षाबंधननिमित्त परराज्यातून येणाऱ्या भेसळयुक्त मिठाईवर एफडीएची नजर

Voice of Eastern

गोळवलकर, सावरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पुस्तकात केलेले वक्तव्य भाजपला मान्य आहे का? – महेश तपासे

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात सत्ता बदल होणार नाही- मंगल प्रभात लोढा

Leave a Comment