मुंबई :
महाराष्ट्राची हवा तरुण उद्योजकांसाठी पूरक आहे. या मातीमध्ये अनेक रोजगार पिकवण्याचा कस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत उद्योग आणि रोजगाराचे स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शासन चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था तरुणांसाठी एक स्तुत्य उपक्रम घेऊन आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या या उपक्रमाच्या कार्यक्रमाला मुंबईच्या डबेवाल्यांनी पाठिंबा दर्शविला. मुंबईचा डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके आणि सहकारी यांनी ग्रँटरोड येथील संस्थेच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा आणि उद्योजकता या विषयांना अनुसरून ही संस्था महाराष्ट्राच्या तरुणांपर्यंत पोहचणार आहे. नेतृत्व कौशल्य आणि सामाजिक कार्यात आवड असणार्या तरुण तरुणींना या संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. त्याचा विस्तार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक या जिल्ह्यातून पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. ‘चला परिवर्तनाचे शिलेदार होऊ या’ या बोध वाक्याच्या प्रेरणेने महाराष्ट्रात उद्योग क्रांती घडवून आणता येईल असा विश्वास संस्थेच्या सभासदांचा आहे. या संस्थेचा विस्तार प्रचार आणि प्रसार माध्यमाद्वारे करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आणि प्रतिमेला कुठेही गालबोट लागेल असे वक्तव्य किंवा कृती आपल्या हातून घडणार नाही ह्याची दक्षता घेण्याचे आश्वासन देखील या संस्थेने दिले आहे.