मुंबई :
आगामी एका वर्षाच्या आत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गडकरी यांच्या हस्ते आज रायगड जिल्ह्यात १३१.८७ कोटींच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि ४३० कोटी रुपयांच्या ४२ किलोमीटर मार्गासाठी भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम एकूण ११ टप्प्यांमध्ये (पॉकेटस) सुरु आहे. सुरवातीच्या काळात भूमी अधिग्रहण, रेल्वे विभाग आणि वनविभागाच्या परवानग्या यामुळे कामाला उशीर झाला. मुंबई-गोवा ही हृदयवाहिनी आहे. त्यामुळे हे काम नक्कीच एक वर्षाच्या आत पूर्ण करु. हा महामार्ग आता केवळ मुंबई-गोवा नाही तर पुढे तो मंगलोरपर्यंत नेण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर शासकीय जमीन उपलब्ध झाली तर लॉजिस्टीक पार्क आणि ट्रक टर्मिनल उभा करण्यास सर्वतोपरी मदत करु, असे गडकरी याप्रसंगी म्हणाले.

कोकणताली युवकांना मिळणार्या रोजगाराच्या संधीबद्दल गडकरी यांनी सांगितले की, गेल्या सात वर्षात जेएनपीटीमध्ये एक लाख कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. जेएनपीटीमध्ये २०१६ मध्ये ५७० कोटी रुपये खर्च करुन विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) सुरु करण्यात आले. त्यात आता २४ कंपन्या आलेल्या आहेत. या माध्यमातून ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक लवकरच येणार आहे. यामुळे कोकणातील दीड लाख युवकांना रोजगार मिळेल.
एमएसआरडीसीच्या सहकार्याने १३१.८७ किमी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी १०३६.१५ कोटी रुपये खर्च आला आहे. या रस्त्यामुळे माणगाव, मसाळा, दिघीपूर बंदर राष्ट्रीय मार्ग ७५३ एफ वर ५४.७५० किमी दुहेरी सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यात आला आहे. यासाठी ४५७.५२ कोटी रुपये खर्च आला आहे. इंदापूर, तळा, आगरदंडा राष्ट्रीय महामार्ग ५४८ अ वर ४२.३४५ किमी लांबीचा दुहेरी सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यात आला आहे. यासाठी ३५५.१७ कोटी रुपये खर्च आला आहे. पुणे-रायगड सीमेवर माणगावजवळ ३६ किमी पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. यासाठी २२३.४६ कोटी रुपये खर्च आला आहे. या विकासकामांमुळे हरिहरेश्वर मंदिर, दिवेघरचे सुवर्ण मंदिर, मुरुड-जंजिरा किल्ला, पद्मदुर्गा किल्ला, श्रीवर्धन आणि दिवेघर सागरी किनार्यांना चांगली रस्ते जोडणी मिळाली आहे.