मुंबई
आयआयटी मुंबईत सुरू असलेल्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यंदाही विद्यार्थ्यांनी कोटींची उड्डाणे घेतली आहेत. प्लेसमेंट्च्या सहाव्या दिवसापर्यंत १२०१ विद्यार्थ्यांना नोकर्या मिळाल्या आहेत. आतापर्यंत सर्वात मोठी वार्षिक २ कोटी ५ लाख रुपयांची ऑफर उबेर कंपनीकडून मिळाली आहे. रॅक्युटेन, क्वालकॉम, सॅमसंग रिसर्च इन्स्टिट्यूट, इंटेल कॉर्पोरेशन या नामांकित कंपन्यांकडूनही विद्यार्थ्यांना देशात आणि परदेशात नोकरीच्या गलेलठ्ठ पगाराच्या ऑफर्स मिळाल्या आहेत.
आयआयटी मुंबईच्या कॅम्पस प्लेसमेंटला १ डिसेंबरपासून सुरुवात झाली. २४० कंपन्यांनी आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांची विविध पदांवर नियुक्ती केली. उबेर कंपनीने सर्वात मोठे वार्षिक २.७४ लाख अमेरिकन डॉलर्सचे पॅकेज दिले आहे. रॅक्युटेन कंपनीने जगभरातील आपल्या कंपन्यांमध्ये सर्वाधिक २६ ऑफर्स दिल्या. रॅक्युटेनकडून विद्यार्थ्यांना वार्षिक १.२१ लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजे ९१ लाख ७९ हजारांचे पॅकेज दिले आहे. या शिवाय क्वालक्म कंपनीकडून विद्यार्थ्यांना आतपर्यंत ४० ऑफर्स मिळाल्याची माहिती प्लेसमेंट सेलने दिली आहे. सॅमसंग रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंटेल कॉर्पोरेशन कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना सर्वाधिक ऑफर्स मिळाल्याची माहिती आयआयटी मुंबईकडून देण्यात आली आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट, क्वालकॉम, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, एअरबस, बेन अॅण्ड कंपनी यांच्याकडून विद्यार्थ्यांना चांगल्या देशांतर्गत ऑफर्स मिळाल्या आहेत.
यंदाच्या प्लेसमेंट्स पर्वाच्या शेवटी सहभागी कंपन्यांमध्ये मागील वर्षीपेक्षा २५ टक्क्यांची वाढ दिसून येण्याची अपेक्षा आयआयटी मुंबई प्लेसमेंट सेलकडून व्यक्त होत आहे. यंदा विद्यार्थ्यांना मुलाखतपूर्व प्रस्ताव मिळण्याचे प्रमाणही काहीसे वाढले आहे. गेली दोन वर्षे करोनाच्या प्रादुर्भावामुळे नोकरीच्या संधी रोडावल्याचे चित्र पालटताना दिसत आहे. विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या नव्या नियुक्त्यांसाठी सरसावल्या असल्याचे दिसून येत आहे. यंदा प्री प्लेसमेंट ऑफर्समध्येही जास्त पॅकेज मिळवणार्या व त्या ऑफर्स मान्य करणार्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याची माहिती आयआयटी प्लेसमेंट सेलकडून देण्यात आली आहे.