मुंबई :
मुंबईमध्ये क्रुझ पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने बीपीएक्स-इंदिरा डॉक्स येथे उभारण्यात येत असलेले आयकॉनिक क्रुझ टर्मिनल म्हणजेच मुंबई आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल हे जुलै २०२४ पर्यंत सुरू प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी दिली. ४९५ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार्या या टर्मिनलची क्षमता वर्षाला २०० जहाजे आणि १० लाख प्रवासी हाताळण्याची आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने ३०३ कोटी रुपये तर खासगी उद्योजकांनी उर्वरित खर्च केला असल्याची माहिती जलोटा यांनी दिली.
मुंबई आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल हे भारतातील पहिलेच आयकॉनीक सी क्रुझ टर्मिनल आहे. हे टर्मिनल ४.१५ लाख वर्ग फुट क्षेत्रावर बांधण्यात आले असून, त्यामध्ये २२ लिफ्ट्स, १० एस्क्लेटर्स आणि ३०० चारचाकी वाहनांसाठी बहुमजली वाहनतळ आहे. या डॉकवर एकावेळी दोन क्रुझ जहाजे लागू शकतील, अशी माहिती जलोटा यांनी दिली. भारताचा बंदर विकास कार्यक्रम ‘सागरमाला’ प्रकल्पाला ७ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भविष्यात मुंबई पोर्ट ट्रस्टचा प्रमुख उपक्रम हा जलवाहतूक म्हणजेच अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय क्रुझिंग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणाकडून प्रवासी वाहतूक क्रुझ पर्यटन आणि जहाज दुरुस्तीवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मुंबई, गोवा, कोची आणि भारताच्या पूर्व किनार्यावरील बंदरे देशाची क्रुझ केंद्रे म्हणून विकसित करण्यासाठी आणि भारताची क्रुझ व्यवसायाचे केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी मे महिन्यात क्रुझ परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जलोटा यांनी दिली.
कान्होजी आंग्रे दीपस्तंभाचा विकास करणार
क्रुझ पर्यटनाला चालना आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दीपस्तंभ पर्यटन योजनेअंतर्गत कान्होजी आंग्रे बेटाचा विकास करण्यात येणार आहे. या बेटावर १८ कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली असून, सर्व कामे मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या बेटावर ट्रेकिंग, बसण्याच्या जागा, प्रेक्षक गॅलरी, आरामासाठी बेंच, वेलींचे आणि लाकडाचे सुंदर मांडव, खुले उपहारगृह, गाणी आणि इतर कलांचे कार्यक्रम अशा सोयी उपलब्ध केल्या जातील, असेही जलोटा यांनी सांगितले.