मुंबई :
मुंबई महापालिकेच्या शाळांचा दर्जा घसरत असल्याची टीका करत अनेकदा होत असते. मात्र नुकत्याच झालेल्या एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंगमध्ये मुंबई महापालिकेच्या दोन शाळांनी देशातील सर्वोत्तम १० शाळांमध्ये स्थान पटकावले आहे. मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी-फेस मनपा शाळेने पाचवा तर जोगेश्वरीतील मुंबई पब्लिक स्कूल पूनम नगर सीबीएसई स्कूलने देशातून दहावा क्रमांक पटकावला आहे.
We’ve got 2 schools of the @mybmc in the @EWPortal ’s top ten in India!
Proud that the Mumbai Public School, Worli is ranked 1 in Maharashtra, 5th in India and and MPS Poonam Nagar CBSE is ranked 2 in Maharashtra and 10th in India.
Well done @mybmcedu https://t.co/vX5QJRAZ3N— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 17, 2021
एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंगद्वारे शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या शाळांची क्रमवारी जाहीर करण्यात येते. त्यानुसार नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीमध्ये देशातील सर्वोत्तम १० शासकीय शाळांमध्ये मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी-फेस मनपा शाळेला राष्ट्रीय स्तरावर पाचवे तर राज्यस्तरावर पहिल्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे. तर जोगेश्वरीतील मुंबई पब्लिक स्कूल पूनम नगरने राष्ट्रीय स्तरावर दहावा तर राज्य स्तरावर दुसरा क्रमांक पटकावला आहे. वरळी सीफेस मनपा शाळा आणि आयआयटी पवईमधील केंद्रीय विद्यालय यांना पाचवा क्रमांक विभागून देण्यात आला आहेत. तर ओरिसामधील ओरिसा आदर्श विद्यालय आणि जोगेश्वरीतील पूनम नगर मनपा या शाळांना दहावा क्रमांक विभागून देण्यात आला आहे. वरळी सीफेस मनपा शाळेने ११३६ गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला आहे. मात्र वरळी सीफेस या शाळेची गतवर्षीच्या चौथ्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. जोगेश्वरीतील मुंबई पब्लिक स्कूल पूनम नगरची कामगिरी उल्लेखनीय असून, गतवर्षी कोणत्याही क्रमवारीत नसलेल्या या शाळेने १०९१ गुणांसह १० क्रमांक पटकावला आहे. या सर्वेक्षणासाठी ऑगस्ट २०२१ मध्ये लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज शाळेमार्फत सादर करण्यात आले होते. लिंकमध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावरील दोन शाळांची निवड करण्यात आल्याची माहिती पालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली. या सर्वेक्षणासाठी देशातील २८ शहरांमधील ११ हजार ४५८ शाळा, शैक्षणिक संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक व पालक यांच्याकडून माहिती घेण्यात आली.
राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत या शाळा आणि मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे अभिनंदन केले आहे. या सर्वेक्षणामधील गुणांकनात शाळेतील शिक्षकांचा अध्यापन दर्जा व क्षमता, शाळा इमारत भौतिक सुविधा, अध्यापन कृती, विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी उपक्रम, सह-शालेय उपक्रम, ऑनलाईन पद्धतीने अध्यापन, मुख्याध्यापक नेतृत्व गुण, पालकांचा सहभाग, या सर्व मुद्द्याचा सखोल विचार करून या शाळांची निवड करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.