मुंबई :
मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी रेल्वे गाडी आता महापालिकेच्या उद्यान खात्याने साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक एक जवळ दिमाखात उभी असलेली महापालिकेची ‘उद्यान एक्स्प्रेस’ सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. ‘उद्यान एक्स्प्रेस’चे वैशिष्ट्य म्हणजे ही टाकाऊ वस्तूंपासून बनवण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक एकच्या जवळ असणारे प्रवेशद्वार आणि भुयारी मार्गालगत महापालिकेचा अवघ्या १६१ चौरस फुटांचा एका छोटाशा भूभागावर ही ‘उद्यान एक्स्प्रेस’ दिमाखात उभी आहे. मृत माडाच्या झाडाच्या खोडापासून ही रेल्वेची प्रतिकृती उद्यान खात्याच्या कर्मचार्यांनी साकारली आहे. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनात महापालिकेच्या ‘ए’ विभाग उद्यान खात्यातील माळी रविंद्र शिंदे व संदीप कुंभार यांनी ही प्रतिकृती साकारली आहे. ‘उद्यान एक्स्प्रेस’ उभ्या असलेल्या भूखंडाचे सुशोभीकरणही उद्यान खात्याकडून करण्यात आले आहे.
या भूखंडावर ‘जंपिंग ग्रास’ या गवताची आकर्षक हिरवळ लावण्याबरोबर ‘एक्झोरा’, चाफा, ‘काॅर्डिया सबेस्टेना’ ही शोभेची झाडेही लावली आहेत. वसंत ऋतूत ही झाडे बहरल्याने ‘उद्यान एक्स्प्रेस’ भोवती फुलांचा आकर्षक सडा पडत असल्याने तिच्या आकर्षणामध्ये अधिकच भर पडत आहे. त्यामुळे पालिकेच्या या ‘उद्यान एक्सप्रेस’ ला आपल्या ‘मोबाईल’ मध्ये टिपण्याची किंवा सेल्फी काढण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.