मुंबई
राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आता काही पोलिसांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेसाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ५५ वर्षांवरील पोलिस कर्मचार्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील गाईडलाईन्सही जारी करण्यात आले आहेत.
मुंबईत आतापर्यंत ९५१० पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, १२३ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यातच मागील २४ तासांत ७१ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील पोलिस कर्मचार्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेता पोलिसांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुसर्या लाटेत ५० वर्षांवरील पोलिसांना अधिक फटका बसला होता. पोलीस हे अत्यावश्यक सेवेत येत असल्याने ५० वर्षांवरील पोलिसांना सर्वाधिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकृतीसंदर्भात हयगय होऊ नये यासाठी राज्यातील ५५ वर्षांवरील पोलिसांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’चा निर्णय गृह विभागाकडून घेण्यात आला आहे. या पोलिस कर्मचार्यांना कमी महत्त्वाचे काम देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. त्याची आता अंमलबजावणी करण्यात येणार आहे.