मुंबई :
मुंबई विद्यापीठाचा २०२१ चा वार्षिक दीक्षान्त समारंभ विद्यापीठाच्या फोर्ट येथील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात शुक्रवार १० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे. महत्वाचं म्हणजे या दीक्षान्त समारंभाचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावरून होणार आहे.
जे विद्यार्थी २०२१ मधील प्रथम तसेच व्दितीय सत्रामध्ये त्यांच्या परीक्षेत दीक्षान्त समारंभाच्या दिवसापूर्वी म्हणजे १० डिसेंबर २०२१ पूर्वी उत्तीर्ण झाले आहेत. त्या विद्यार्थ्यांना दीक्षान्त समारंभानंतर पदवी प्रमाणपत्रे त्यांच्या महाविद्यालयातुन वितरीत करण्यात येतील. यावर्षीच्या पदवी प्रमाणपत्राची यादी लवकरच मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यातील आपले पदवी प्रमाणपत्र क्रमांक विद्यार्थ्यांनी शोधून आपल्या महाविद्यालयात सादर करावे म्हणजे महाविद्यालय संबंधित विद्यार्थ्याला पदवी प्रमाणपत्र वितरीत करतील असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
२०२० चा मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समांरभ १ फेब्रुवारी २०२१ रोजी संपन्न झाला होता. या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १,९१,४९५ विद्यार्थ्यांना पदवी /पदविका प्रदान करण्यात आल्या. यावर्षी २ लाखापेक्षा जास्त विद्यार्थी पदवी प्राप्त करतील.
पदवी प्रमाणपत्रे न मिळाल्यास किंवा त्यात काही त्रुटी आढळल्यास त्यासंबंधीची लेखी तक्रार दीक्षान्त समारंभाच्या दिवसापासून एक महिन्याच्या विद्यानगरी येथील परीक्षा विभागात करावी.
– हिम्मत चौधरी, उपकुलसचिव, प्रमाणपत्र विभाग