मुंबई
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाल्याने १० डिसेंबरला होणारा दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता विद्यापीठाकडून दीक्षांत समारंभाची २७ डिसेंबरही नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई विद्यापीठाच्या २०२०-२१ मधील शैक्षणिक वर्षातील विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रदान करण्यासाठीचा दीक्षांत समारंभ २७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ विद्यापीठाच्या फोर्ट येथील सर कावसजी जहाँगीर हॉलमध्ये होणार आहे. यासंदर्भातील माहिती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागाचे प्रमुख, संचालक, संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, महाविद्यालय व्यवस्थापन तसेच मुंबई विद्यपीठाचे उपकेंद्र असलेल्या रत्नागिरी, ठाणे आणि कल्याणच्या समन्वयकांनाही परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.