Voice of Eastern

मुंबई

परदेश दौर्‍याहून आलेले कुलगुरूंना मुंबई महापालिकेने क्वारंटाईन केल्याने १० डिसेंबरला होणारा मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. ऐनवेळी दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्यात आल्याने पदवी प्रमाणपत्र मिळण्याच्या अपेक्षेवर असलेल्या विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. कुलगुरू गैरहजर असतील तर कुलपती व प्र-कुलगुरू यांच्या उपस्थितीमध्ये दीक्षांता समारंभ करण्यात कोणती अडचण होती, असा प्रश्न काही अधिसभा सदस्यांनी उपस्थित केला.

मुंबई विद्यापीठाचा १० डिसेंबरला होणारा वार्षिक दीक्षांत समारंभ काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात येत आहे. तसेच समारंभाची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी परिपत्रकाद्वारे ९ डिसेंबरला जाहीर केले. यामुळे पदवी प्रमाणपत्र घेण्याच्या अपेक्षेवर असलेल्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. विद्यापीठाकडून अपरिहार्य कारणामुळे दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात नुकतेच काही दिवसांपूर्वी परदेश दौरा करून भारतात आलेले विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांना ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे कुलगुरू दीक्षांत समारंभाला उपस्थित राहू शकत नसल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. मात्र दीक्षांत समारंभ अचानक पुढे ढकलण्यात आल्याने विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे.

दरम्यान, मुंबई विद्यापीठातील अनेक कार्यक्रम तसेच नुकतेच मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिसभा प्र-कुलगुरूंच्या उपस्थितीत ऑनलाईन घेण्यात आली होती. त्यामुळे राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण सापडत असताना दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्याऐवजी प्र-कुलगुरूंच्या उपस्थित घेण्यात कोणती अडचण होती, असा प्रश्न मुंबई विद्यापीठाच्या काही अधिसभा सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

Related posts

भर समुद्रात अंमली पदार्थ तस्करी; २१८ किलो हेरॉईन जप्त

अतिरिक्त शिक्षकांना बीएलओ (BLO) ड्युटीऐवजी रात्रशाळेत शिकवू द्या

तिसर्‍या लाटेविरोधात गणेश मंडळांचे ४५० कार्यकर्ते सज्ज

Voice of Eastern

Leave a Comment