Voice of Eastern

मुंबई : 

१४५ वर्षे जुने असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कावसजी जहाँगीर दीक्षांत सभागृहात पदवी, पदव्युत्तर प्रमाणपत्र सन्मानाने घेणे हे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. या सभागृहात कुलपती, कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारणे हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक सोनेरी क्षण असतो. परंतु मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागातील व महाविद्यालयातील काही मोजक्याच विद्यार्थ्यांचे हे स्वप्न पूर्ण होते. प्रत्येक विद्यार्थ्याला हा क्षण अनुभवता यावा यासाठी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना सभागृह उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहास ऐतिहासिक महत्त्व आणि इतिहास आहे. हे सभागृहाची नोंद युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजमध्येही झाली आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या सभागृहामध्ये दरवर्षी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते. हे पदवी प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठाकडून दीक्षांत सभारंभावेळी प्रातिनिधीक स्वरूपात ठरावीक विद्यार्थ्यांनाच देण्यात येते. त्यामुळे मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील अन्य विद्यार्थ्यांचे दीक्षांत सभागृहात कुलपती, कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारण्याचे स्वप्न अधुरेच राहते. त्यामुळे विद्यापीठाने विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना त्यांच्या दीक्षांत समारंभासाठी सभागृह उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी युवासेनेचे मुंबई विद्यापीठातील अधिसभा सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्याकडे केली आहे. यामुळे ऐतिहासिक सभागृहात पदवी प्रमाणपत्र स्वीकारण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तसेच हा कार्यक्रम विद्यापीठाच्या आवारातच असल्याने कुलगुरू व प्र-कुलगुरू हे सुद्धा त्यांच्या वेळेनुसार कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ झाल्यानंतर पुढील काही दिवस हे सभागृह विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना उपलब्ध करून देण्यात यावे. सभागृह उपलब्ध करून देण्यात पारदर्शकता राहण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था ठेवण्यात यावी. संकेतस्थळावर सभागृहाच्या उपलब्धतेच्या माहितीनुसार महाविद्यालये त्यांच्या सोयीनुसार सभागृह कार्यक्रमासाठी निश्चित करू शकतात. आवश्यक असल्यास महाविद्यालयांकडून नाममात्र शुल्क आकारल्यास विद्यापीठावर वीज, डेकोरेशनचा भार पडणार नाही, अशा सूचनाही युवासेने अधिसभा सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांना निवदेनाद्वारे केल्या आहेत.

Related posts

पावसाची उसंत मात्र दुर्घटनासत्र सुरूच; ३ जण जखमी

Voice of Eastern

पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशात यंदा १५ टक्क्यांनी वाढ – चंद्रकांत पाटील

Leave a Comment