Voice of Eastern

मुंबई : 

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मागील १४ वर्षांपासून विविध ठिकाणी वसलेल्या झोपड्या येत्या दोन महिन्यात हटवण्यात येतील, अशी माहिती कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर यांनी अधिसभेमध्ये दिली. या झोपड्या हटवण्यासाठी कुलसचिव प्रा. सुधीर पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार असून त्यात विद्यापीठाचे अभियंता आणि सिनेट सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाच्या पाठीमागे १४ वर्षांपासून वसलेल्या झोपड्यांचा विषय अधिसभेमध्ये उपस्थित केला. विद्यापीठातील विविध कामांसाठी कंत्राटदारांनी आणलेल्या कामगारांनी या झोपड्या बांधल्या आहेत. यामध्ये राहणार्‍या अनेक कामगारांच्या मुलांच्या जन्म येथेच झाला असून, त्यांच्या जन्मदाखल्यावर कलिना कॅम्पसचा पत्ता असल्याचे थोरात यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे एक दिवस कालिना संकुल हे या झोपड्यामुळे एसआरए कालिना सोसायटी होईल अशी भीती त्यांनी व्यक्त करीत या झोपड्यांवर कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला.

सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी आम्ही वेळोवेळी विद्यापीठात झालेल्या झोपड्यांच्या अतिक्रमणाचा विषय लक्षात आणून देतो, मात्र त्यावर कारवाई केली जात नाही हे गंभीर असल्याचे सांगितले. त्यावर कंत्राटदारांचे काम पूर्ण झाल्यावर या झोपड्या लवकरात लवकर पाडल्या जातील असे आश्वासन कुलसचिव सुधीर पुराणिक यांनी दिले. मात्र त्यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. सिनेट सदस्य वैभव नरवडे यांनीही झोपड्यांवरील कारवाईची मागणी लावून धरली. त्यामुळे कुलगुरूंनी यावर उत्तर देत विद्यापीठाच्या कालिना संकुलात असलेल्या झोपड्या पुढील दोन महिन्यात पाडण्यात येतील असे आश्वासन दिले. यासाठी त्यांनी कुलसचिव यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने समिती गठीत करत या समितीमध्ये सिनेट सदस्य वैभव थोरात, वैभव नरवडे आणि सुधाकर तांबोळी यांची नियुक्ती करत त्यांना विद्यापीठाला मदत करण्याचे आवाहन केले. यापुढे विद्यापीठातील कामकाजासाठी येणार्‍या कामगारांना राहण्याची मुभा दिली जाऊ नये, त्यासाठी त्यांच्याकडून लिहून घ्यावे यासाठीची दक्षता घ्यावी अशा सूचनाही कुलगुरूंनी यावेळी दिल्या.

Related posts

दहिसर कांदळवन उद्यानाचा रस्ता सहा महिन्यात करावा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

 ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ स्पर्धेत सहभागी व्हा, बक्षिसे मिळवा – मुख्य निवडणूक अधिकारी 

मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचा मुंबईला विळखा

Leave a Comment