मुंबई :
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुखवट्यामुळे ७ फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील आयडॉलमध्ये सुरू असलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षेसंदर्भातील तारीख लवकरच आयडॉलकडून जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने ७ फेब्रुवारीला जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमुळे सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व शासकीय कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई विद्यापीठाने संलग्नित, संचलित, स्वायत्त सर्व महाविद्यालयांचे प्रशासकीय व शैक्षणिक कामकाज बंद ठेवले. तसेच ७ फेब्रुवारीला विद्यापीठातील सर्व नियोजित बैठकाही पुढे ढकलल्या आहेत. त्याचअनुषंगाने मुंबई विद्यापीठातील दूरस्थ शिक्षण देणार्या आयडॉलनेही ७ फेब्रुवारी असलेली परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयडॉलच्या एमए व एमकॉम या दोन अभ्यासक्रमांच्या परीक्षा ७ फेब्रुवारीला ऑनलाईन माध्यमातून होणार होती. सार्वजनिक सुट्टीमुळे या दोन्ही अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यातआल्या आहेत. या परीक्षांची तारीख लवकरच कळवण्यात येईल, असे आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले.