मुंबई
एलएलएम अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील प्रवेशाच्या सर्व फेर्या पूर्ण झाल्या. मात्र मुंबई विद्यापीठातील विधी विभागांतर्गत शिकवण्यात येणार्या एलएलएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची फक्त पहिलीच फेरी पूर्ण झाली आहे. महाविद्यालयांकडून प्रवेश फेरी व्यवस्थितरित्या राबवण्यात येत असताना विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचाा पुन्हा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. विद्यापीठाच्या विधी विभागाकडून प्रवेश प्रक्रिया विलंबाने राबवण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना भरमसाठ शुल्क भरून महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावे लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
एलएलएम अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागामध्ये आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी एकत्रित सीईटी परीक्षा घेण्यात येते. सीईटी परीक्षा झाल्यानंतर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाकडून उच्च शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार एलएलएम अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेर्या राबवत प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. मात्र मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाने ४ ते १७ नोव्हेंबरदरम्यान फक्त पहिली फेरीतील प्रवेश पूर्ण केले आहेत. या पहिल्या फेरीमध्ये १५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या तरी विद्यापीठाकडून प्रवेश फेरी राबवण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे विधी विभागात प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव महाविद्यालयांमध्ये भरमसाठ शुल्क भरून प्रवेश घ्यावे लागत आहेत. तसेच महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रवेश रद्द केल्यास महाविद्यालयांकडून शुल्क परत केले जात नाही. परिणामी विद्यापीठाकडून विलंबाने चालवण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची प्रचंड कोंडी झालेली आहे.
त्यातच मुंबई विद्यापीठाने प्रवेश प्रक्रिया सुरू असताना नियमित तासिका सुरू केल्याने प्रवेश प्रक्रिया राबवणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे विधी विभागाने तातडीने पुढील प्रवेश प्रक्रिया राबवावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
एलएलएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकत्रित सीईटी घेण्यात आली. मग महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली तरी मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाची फक्त पहिलीच फेरी कशी काय होते. विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना नेहमीच फटका बसत आहे. विद्यापीठाने तातडीने प्रवेश प्रक्रिया राबवावी. - अॅड. सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ काऊन्सिल