मुंबई :
परीक्षेनंतर 45 दिवसांमध्ये निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. मात्र मुंबई विद्यापीठाने एलएलएमच्या चौथ्या सत्राची परीक्षा होऊन चार महिने उलटले तरी अद्याप मुंबई विद्यापीठाने निकाल जाहीर केला नाही. विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधींना मुकावे लागत आहे. त्यामुळे एलएलएमचा निकाल तातडीने लावण्यात यावी अशी विनंती विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
मुंबई विद्यापीठाकडून एलएलएमच्या चौथ्या सत्राची लेखी परीक्षा जून 2021 मध्ये घेतली होती. त्यानंतर काही दिवसांने 26 जूनला विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेण्यात आली. विद्यापीठाच्या नियमानुसार परीक्षा झाल्यानंतर 45 दिवसांत निकाल जाहीर करण्यात येतो. त्यामुळे ऑगस्टमध्ये निकाल जाहीर झाल्यावर नोकरीच्या विविध संधी शोधण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांची होती. मात्र परीक्षा संपून चार महिने झाले तरी विद्यापीठाकडून निकाल जाहीर करण्यात आला नाही. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थी हतबल झाले आहेत. निकालाला उशीर होत असल्याने नोकरीच्या तसेच उच्च शिक्षणाच्या संधीही गमावाव्या लागत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांचे होणारे हाल लक्षात घेता स्टुडंट लॉ काऊन्सिलचे अध्यक्ष अॅड. सचिन पवार यांनी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांना एलएलएमच्या विद्यार्थ्यांचा निकाल तातडीने लावण्यात यावा, अशी विनंती करणारे पत्र लिहिले आहे. वेळेवर निकाल लावणे अपेक्षित असतानाही विद्यापीठाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या विलंबाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे निकाल तातडीने लावण्यास विद्यार्थ्यांचे पुढील नुकसान टाळणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.