मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची वार्षिक बैठक १५ मार्च रोजी आभासी पद्धतीने घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यावर मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनी जोरदार विरोध केल्याने अखेर मुंबई विद्यापीठाने अधिसभा ऑनलाईन पद्धतीऐवजी प्रत्यक्ष घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८ (४) नुसार मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची वार्षिक सभा १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आभासी पद्धतीने घेण्याचे कुलसचिव सुधीर पुराणिक यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिसभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. यावर मुंबई विद्यापीठातील सिनेट सदस्यांनी राज्यातील शाळांपासून महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू झाली असून, राज्याचे अधिवेशनही प्रत्यक्ष घेण्यात येत आहे. असे असताना अधिसभा ऑनलाईन पद्धतीने का घेण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित करत कुलगुरूंना लक्ष केले. तसेच युवासेना सिनेट सदस्य डॉ. सुप्रिया करंडे, अॅड. वैभव थोरात, डॉ. धनराज कोहचाडे, मिलिंद साटम यांनी अधिसभा प्रत्यक्ष घेण्याबाबत कुलसचिवांना निवेदनही दिले होते. अखेर मुंबई विद्यापीठाची १५ मार्च रोजी होणारी वार्षिक अधिसभा प्रत्यक्ष घेण्यात येणार आहे. कोरोना निर्बंध शिथील झाल्यामुळे कोव्हिड नियमांचे अनुपालन करून ही बैठक प्रत्यक्ष पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे कुलसचिव सुधीर पुराणिक यांनी सांगितले.