Voice of Eastern

मुंबई : 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महाविद्यालये सुरू झाली असली तरी परीक्षा कशापद्धतीने होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. हा संभ्रम अखेर मुंबई विद्यापीठाने गुरूवारी दूर केला. मुंबई विद्यापीठाच्या २०२२ च्या प्रथम सत्र उन्हाळी परीक्षा काही ऑफलाईन तर काही ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने घेतला आहे. या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पदवीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या सत्र २ नियमित व बॅकलॉग परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. तर सत्र १, ३ व ५ बॅकलॉगच्या परीक्षा आणि सत्र ४ ची नियमित व बॅकलॉग परीक्षा ही ऑनलाईन घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सत्र ६ च्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची संख्या, कोकणातील एसटी महामंडळाच्या संपाची परिस्थिती आणि कोविडची परिस्थिती विचारात घेऊन १ मार्च २०२२ पर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे. कला, वाणिज्य व विज्ञान पदव्युत्तर सत्र २ व ४ नियमित व बॅकलॉग परीक्षा ऑफलाईन तर सत्र १ व ३ बॅकलॉगच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येण्यार्‍या कला, वाणिज्य व विज्ञान पदवी व पदव्युत्तर परीक्षा या ५० टक्के बहुपर्यायी प्रश्न व ५० टक्के वर्णनात्मक प्रश्न या पद्धतीने घेण्यात येतील.

व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या सत्र १ ते ४ नियमित व बॅकलॉग परीक्षा, अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर व एमसीए अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा, शिक्षणशास्त्र पदवी परीक्षा सत्र २ व ४ या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. तसेच सत्र १ व ३ बॅकलॉगच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतील. आंतर-विद्या शाखेतील उर्वरित परीक्षा, विधी शाखेच्या सर्व परीक्षा नियमित व बॅकलॉग या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग व उपपरिसरे यांच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येतील. २०२२ च्या प्रथम सत्र उन्हाळी परीक्षेचे सविस्तर परिपत्रक परीक्षा विभागाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

Related posts

फुले, आंबेडकर यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी कष्ट उपसले – चंद्रकांत पाटील

महिला दिनी महाराष्ट्रातल्या तीन महिलांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारी शक्ती पुरस्कार’

पुणे महिला संघाला सांघिक विजेतेपद तर पुरुषांमध्ये मुंबईची बाजी 

Voice of Eastern

Leave a Comment