मुंबई :
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावाच्या जलविद्युत स्टेशनमध्ये २८ फेब्रुवारीला काही तांत्रिक दोष निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही कपात लागू राहणार असल्याचे जल अभियंता खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व भातसा या सात तलावातून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा मुंबईला होतो. गतवर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस पडल्याने सातही तलावांत मुबलक पाणीसाठा होता. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले होते. मात्र भातसा जल विद्युत निर्मिती स्थानकात तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यक पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे