मुंबई
मुंबई महापालिका लसीकरण पूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. मात्र मुंबईतील तब्बल तीन लाख नागरिकांनी दुसर्या डोसची मुदत संपूनही अद्यापपर्यंत डोस घेतलेला नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी पालिकेने सर्व २४ वॉर्डात शोधमोहीम सुरू केली असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले. यावेळी सुरुवातीला लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी २८ दिवसांची मुदत होती. मात्र काही दिवसांनी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ही मुदत ८४ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली. मात्र मुदत वाढवूनही अनेकांनी दुसरा डोस घेण्यास हलगर्जीपणा दाखवल्याचे समोर आले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर अनेक जण बाहेरगावी गेले. तर काही जण वैयक्तिक कारणांनी लसीकरणापासून दूर आहेत. मात्र याचा फटका पालिकेच्या लसीकरण मोहिमेला बसला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची यादी वॉर्ड ऑफिसमध्ये पाठवण्यात आली आहे. शिवाय पालिका आपल्या कर्मचार्यांच्या माध्यमातून अशा नागरिकांचा शोध घेत आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच दुसरा डोस मुदत संपूनही घेतला नसलेल्यांनी तातडीने नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन डोस घ्यावा असे आवाहन पालिकेने केले आहे.