मुंबई :
ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी तसेच त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आता मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. सध्या शाळेत येणार्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा होईपर्यंत तसेच नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेची चाचपणी तसेच संपूर्ण अभ्यासाचा उजळणी करून घेण्यासाठी पालिकेकडून विशेष उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणाचा मोठा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडला आहे. ऑनलाईन शिकवलेले शिक्षण विद्यार्थ्यांना कितपत कळले आहे. याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे ऑनलाईन शिकवलेल्या शिक्षणाचे मूल्यमापन करण्यासाठी तसेच आता शाळेत येणार्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी वार्षिक परीक्षा होईपर्यंत किंवा नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी या उपक्रमाला मार्चपासूनच सुरुवात करण्यात येणार आहे. कोरोनानंतर शाळा सुरू झाल्यानंतर दीड महिन्याने प्रत्यक्षरित्या होणार्या परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये असलेला मानसिक तणाव, भीती या बाबी लक्षात घेऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवणे, दोन वर्षांमध्ये शिकवलेल्या अभ्यासक्रमाचे किती आकलन झाले, हे तपासणे शिक्षकांसमोरील मोठे आव्हान आहे. सर्वसामान्य विद्यार्थी हा शिक्षणाच्या प्रवाहात मागे पडू नये व त्यांची गुणवत्ता वाढीस मदत व्हावी यासाठी पालिकेने शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांना विशेष प्रशिक्षण दिले आहे. जेणेकरून कोरोनामध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी व त्यांना सहजरित्या पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे शक्य होणार असल्याचे मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगितले.
विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्याला थेट पुढील अभ्यासक्रम शिकवण्याऐवजी मागील दोन वर्षात त्याने शिकलेल्या अभ्यासाची उजळणी करण्यात येणार आहे. ही उजळणी करण्यासाठी पालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम तयार केला आहे. हा अभ्यासक्रम शिक्षकांकडून पुन्हा उजळणीच्या स्वरुपात विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात येणार आहे. हे गुणवत्ता वाढीसाठीचे हे प्रयत्न वार्षिक परीक्षेपर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र त्यानंतरही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ दिसून न आल्यास आगामी शैक्षणिक वर्षातील सुरुवातीचे काही महिने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी पुन्हा प्रयत्न करण्यात येणार आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचेही शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगितले.