मुंबई :
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली प्रभागांची पुनर्रचना ही राजकीय दबावाखाली करण्यात आली आहे. मुंबईतील २२७ प्रभागांपैकी १४८ म्हणजेच ६५.२ टक्के प्रभागांच्या सीमारेषा बदलण्यात आल्या, तर १६९ प्रभागांमधील काही भाग शेजारच्या प्रभागांमध्ये समाविष्ट केला आहे. हा सर्व प्रकार राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करणारा, नियमबाह्य व बेकायदेशीर असून, त्याचा फटका भाजपला बसणार आहे, असा आक्षेप महापालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी घेतला आहे. प्रभाग पुनर्रचनेत झालेल्या नियमाच्या उल्लंघनाबाबत प्रभाकर शिंदे यांनी एक अहवाल बनवून पालिका आयुक्त इकबाल चहल यांना सादर केला आहे.
मुंबई महापालिकेने निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना करताना काही प्रभागात कमी-अधिक प्रमाणात फेरबदल केले आहेत. याचा फटका भाजप नगरसेवकांना बसणार आहे. त्यामुळे भाजपने या पुनर्रचनेवर आक्षेप घेतला आहे. कलम ४.५.१ नुसार प्रभाग रचना उत्तर दिशेपासून सुरू झाली पाहिजे होती. उत्तरेकडून ईशान्यकडे, पूर्वकडून पश्चिमेकडे आणि शेवटी दक्षिण दिशेने व्हायला हवी होती. मात्र प्रभाग पुनर्रचनेत पालिकेने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे, असा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला. ही प्रभाग पुनर्रचना करताना इमारत, झोपडी किंवा घर यांचे दोन प्रभागांत विभाजन केले आहे. या पुनर्रचनेमुळे लोकप्रतिनिधी व सामान्य जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सुद्धा कमी होणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.