Voice of Eastern

मुंबई :

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सखोल स्‍वच्‍छता मोहीम (डीप क्‍लीन ड्राईव्‍ह) अंतर्गत महानगरपालिकेच्‍या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये १० फेब्रुवारी २०२४ रोजी एकाच वेळी सार्वजनिक स्‍वच्‍छतेचा जागर करण्‍यात आला. विशेषतः दाटीवाटीच्या, अरुंद व झोपडपट्टी परिसरांमध्ये अंतर्गत रस्ते, पदपथ, दुभाजक, लहानसहान गल्‍लीबोळ यांची स्‍वच्‍छता करण्‍यात आली. यात, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी के पूर्व व पी दक्षिण विभागांमधील मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या निर्देशानुसार, स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडून प्रत्‍येक प्रशासकीय विभागात सखोल स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍यात येत आहे. यापूर्वी प्रत्येक परिमंडळात एक याप्रमाणे सात परिमंडळांमध्ये मिळून एकूण सात प्रशासकीय विभागांमध्ये ही मोहीम राबवली जात होती. त्या कार्यपद्धतीनुसार सर्व प्रशासकीय विभागांचा क्रम पूर्ण झाला. स्‍वच्‍छता ही निरंतर प्रक्रिया असल्‍याने त्‍यात सातत्‍य राखायला हवे, या भूमिकेतून महानगरपालिका आयुक्‍त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्‍या निर्देशानुसार, आता यापुढे दर शनिवारी सर्व २४ प्रशासकीय विभागात (वॉर्ड) लोकसहभागातून सखोल स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज करण्यात आलेल्या कार्यवाहीस सर्वत्र स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

रस्ते, पदपथ, लहान-सहान गल्लीबोळांमध्ये असलेला घनकचरा तसेच टाकाऊ वस्तू पूर्णपणे काढणे, तसेच ब्रशिंग करुन रस्ते, पदपथांवरील धूळ काढणे, त्यानंतर पाण्याने धुणे ही सर्व कार्यवाही करतानाच रस्‍त्‍यांवर उगवलेली खुरटी झाडीझुडपे समूळ काढणे, अवैध जा‍हिरात फलक हटविणे, कीटकनाशक धूर फवारणी, पावसाळी जाळ्या- गटारे व नाले यांची स्‍वच्‍छता, धोकादायक तारांचे जंजाळ काढणे आदी विविध कामे सखोल स्वच्छता मोहिमेतून करण्यात येत आहेत. महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी सकाळी ८ वाजेपासून केलेल्या दौऱ्यात या सर्व कार्यवाहीची पाहणी करतानाच स्वतः सखोल स्वच्छता मोहिमेत प्रत्‍यक्ष सहभाग देखील घेतला.

के पूर्व विभागात स्‍वामी वि‍वेकानंद मार्गावर ओमनगर येथे पदपथ व रस्त्यांच्या कडेला पाणी फवारणी करत असताना रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा कडेला उभ्‍या असलेल्‍या वाहनांमुळे, दुचाकींमुळे कचरा काढण्याला त्याचप्रमाणे स्‍वच्‍छतेला अडसर निर्माण होत असल्‍याचे निदर्शनास येताच आयुक्‍त महोदयांनी मुंबई वाहतूक शाखेचे सहपोलिस आयुक्‍त अनिल कुंभारे यांच्‍याशी थेट तेथूनच दूरध्‍वनीवरून संपर्क साधला. संपूर्ण मुंबईत अंतर्गत रस्त्यांवर व इतरत्र देखील रस्त्यांच्या बाजूला खूप दिवसांपासून उभ्‍या असलेल्‍या बेवारस वाहनांमुळे दैनंदिन स्‍वच्‍छतेमध्ये अडथळा निर्माण होतो. त्याचा वाहतुकीलाही त्रास होतो. ही बाब वारंवार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे. यापुढे महानगरपालिका आणि वाहतूक पोलिस यांनी समन्वय साधून ही वाहने हटवण्याची कार्यवाही वेगाने करावी. विभाग पातळीवरील तसेच मुख्यालयातील स्‍वच्‍छता मोहिमेच्‍या बैठकांमध्‍ये वाहतूक पोलिस विभागांच्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, जेणेकरुन या अडचणींचे निराकरण करता येईल, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

पी दक्षिण विभागातील गोरेगाव पश्चिम येथील स्‍वातंत्र्यवीर सावरकर चौक, सुंदर नगर जंक्‍शन, खंडू भंडारी चौक, विठ्ठलपाडा परिसरांमध्ये स्‍वच्‍छता मोहिमेत आयुक्‍त महोदय प्रत्‍यक्ष सहभागी झाले. विठ्ठलपाडा येथील अरुंद वसाहतीत लहानसहान गल्‍लीबोळांमध्ये शिरुन आयुक्‍त महोदयांनी स्‍वच्‍छता केली. पाणी फवारणी करत गल्ली स्वच्छ केली.

Related posts

विद्यार्थ्यांना आता शिकता येणार एकाच वेळी दोन अभ्यासक्रम : यूजीसीकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

श्याम बेनेगल यांच्या ‘मुजीब – द मेकिंग ऑफ ए नेशन’ चित्रपटाचे पोस्टर जारी

उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा – राजेश टोपे

Leave a Comment