मुंबई
नेहमी चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्ययन परिषदेकडेकडून (नॅक) कडून मुंबई विद्यापीठाला आता पाच वर्षा ऐवजी सात वर्षांसाठी मान्यतेची मुदतवाढ मिळाली आहे. मुल्यांकनानंतर सर्वसाधारणपणे ही मुदत पाच वर्षांची असते. नुकतेच मुंबई विद्यापीठाला नॅककडून अ++ श्रेणीसह ३.६५ एवढे सर्वाधिक गुणांकन मिळाले आहे. पूर्वीच्या सर्वोच्च गुणवत्तेच्या निकषानुसार मुंबई विद्यापीठास ही सात वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी विद्यापीठास २००१ ला “फाईव्ह स्टार” (सर्वाधिक श्रेणी) त्यानंतर २०१२ ला “अ” ( सर्वाधिक श्रेणी) प्राप्त झाली होती. याच निकषांवर तिसऱ्यांदा सर्वाधिक गुणांकनासह अ++ श्रेणी प्राप्त झाल्याने पाच वर्षा ऐवजी सात वर्षांसाठी मान्यतेची मुदतवाढ मिळाली आहे. यानुसार आता मुंबई विद्यापीठाकडे २०२८ पर्यंत नॅकचा दर्जा असणार आहे.
नॅककडून सर्वाधिक गुण मिळवणारे मुंबई विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. नॅक पीअर टीमने दिनांक २४ ते २६ ऑगस्ट २०२१ दरम्यान मुंबई विद्यापीठास मूल्यांकनासाठी भेट दिली होती. विद्यापीठाने विविध विद्याशाखांतर्गत दिलेले भरीव योगदान, संशोधनवृतीला चालना, सुसज्ज प्रयोगशाळा, विद्यार्थी विकास अशा सर्व बाबतीत विद्यापीठाने संख्यात्मक आणि गुणात्मक अशा निकषांवर विद्यापीठाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
मुंबई विद्यापीठाने मैलाचा दगड ठरेल अशी अत्यूच्च कामगिरी केली आहे. पाच वर्षा ऐवजी सात वर्षांच्या मुदतवाढीमुळे आता विद्यापीठ ग्रेड वन ऑटोनॉमी तसेच युनिव्हर्सिटी विथ एक्सलेंसला पात्र ठरणार आहे. त्याचबरोबर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रथम श्रेणीतील ‘संशोधन विद्यापीठ’ म्हणूनही विद्यापीठाचे स्थान अधोरेखित होणार आहे असे मत मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
नॅककडून मुंबई विद्यापीठास अ++ च्या श्रेणीसह सर्वाधिक गुणांकन प्राप्त होणे हे अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. २००१ ला प्राप्त झालेली ‘पंचतारांकीत श्रेणी’ आणि २०१२ ला मिळालेला सर्वाधिक श्रेणीचा ‘अ’ दर्जा या अत्यूच्च कामगिरीमुळे मुंबई विद्यापीठास मान्यतेची सात वर्षासाठीची मुदतवाढ ही खूप मोठी जमेची बाब असून हा विद्यापीठास प्राप्त झालेला बहुमान आहे.
– प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ