Voice of Eastern

मुंबई :

राज्य सरकारने राज्यातील दुकाने व आस्थापनांपाठोपाठ मुंबई विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना त्यांचे नामफलक हे प्रथम दर्शनी मराठी भाषेमध्ये असणे अनिवार्य केल्यानंतर आता मुंबई महापालिका मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित आणि सर्व खासगी शाळांचे नामफलक मराठी भाषेमध्ये लावण्याचे निर्देश शाळा प्रशासनांना दिले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील १२९१ पेक्षा अधिक शाळांमधील नामफलक हे मराठीमध्ये झळकणार आहेत.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारडून अनेक निर्णय घेतले आहेत. याचाच एक भाग म्हणून, महाराष्ट्रातील दुकाने व आस्थापनांचे नामफलक हे प्रथम दर्शनी मराठी भाषेमध्ये असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानंतर मुंबई विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना त्यांचे नामफलक मराठीमध्ये असण्याबाबतच्या सूचना दिल्यानंतर आता पालिकेकडूनही मराठी शाळांचे नामफलक मराठीमध्ये दर्शनी भागामध्ये लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आणि राजू तडवी यांनी पालिका मान्यताप्राप्त सर्व शाळांमध्ये सुयोग्य आकाराचे नामफलक हे मराठी देवनागरी लिपीमध्ये असावेत, असे निर्देश मुंबईतील अनुदानित ३९४, विनाअनुदानित ६७८ आणि अन्य खाजगी बोर्डाच्या २१९ शाळांना दिले आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण निरीक्षक यांनी त्यांच्या अधिपत्याखाली अन्य शैक्षणिक मंडळाशी संलग्न शाळांनाही सूचना देण्याचे निर्देश शिक्षणाधिकार्‍यांनी दिले आहेत. महापालिका शाळा मंजूरी क्रमांकासह ८ बाय ३ आकाराचा फलक शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात यावे, असे निर्देशही पालिकेकडून देण्यात आले आहेत.

मुंबईतील अनुदानित, विनाअनुदानित आणि सर्व खाजगी बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी नामफलक लावण्यात यावेत, अशी मागणी युवासेनेच्या वतीने २४ मार्च रोजी पालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ व राजू तडवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. यामध्ये ज्या शाळा मराठीमध्ये दर्शनी फलक लावण्याचे पालन करणार नाहीत त्यांना शिक्षण हक्क कायदा २००९ अंतर्गत नमुना २ अन्वये मिळणारी प्रथम मान्यता देण्यात येऊ नये, अशी सूचना केली होती. या बाबतीत योग्य ती कार्यवाही तातडीने व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती सदस्य आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे, युवासेना सहसचिव अ‍ॅड. संतोष धोत्रे आणि परशुराम तपासे यांनी शिक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर मुंबई महापालिकेकडून ५ एप्रिलला सर्व शाळांना नामफलक मराठीमध्ये काढण्यासंदर्भातील परिपत्रक काढण्यात आले.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागातील सहा जिल्हा अध्यक्षांची घोषणा; पक्ष अंतर्गत निवडणुकीतून निवड

प्रत्येक माणसाची गोष्ट सांगणार ‘कठपुतली कॉलनी’

वरळीतील गॅस सिलिंडर दुर्घटना ; ‘त्या’ चार महिन्याच्या मुलाचा मृत्यू

Leave a Comment