मुंबई :
नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना खासदार हेमंत पाटील यांनी शिवीगाळ करत दिलेल्या हीन वागणुकीचे पडसाद संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रामध्ये उमटू लागले आहेत. हेमंत पाटील यांच्या गैरवर्तणुकीबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनने निषेध केल्यानंतर आता वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे.
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय हे महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या इतर शासकीय महाविद्यालयांप्रमाणे अंतिम टप्प्यातील आरोग्य सेवा देणारे रुग्णालय आहे. त्यामुळे या रुग्णालयामध्ये अत्यवस्थ स्वरुपात रुग्ण येण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मृत्युचे प्रमाण अधिक असते. दरम्यान सोमवारी २४ तासांत २४ मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना जबाबदार धरत त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली. याबाबत वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे. निष्काळजीमुळे अधिक मृत्यू झाले असल्यास त्याची चौकशी होऊन, कार्यवाही होणे गरजेचे असतानाही अधिष्ठाता पदावर उच्च शिक्षित डॉक्टरांना हीन दर्जाची वागणूक देणे समर्थनीय नाही. शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारीका आणि कर्मचारी हे प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावतात अशी आमची धारणा आहे. त्यामुळे केंद्र शासन आणि राज्य शासनाने संबंधित लोकप्रतिनिधी यांच्यावर शासकिय नियमानुसार तात्काळ कार्यवाही करावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना करणारे पत्र वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेने जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांना दिल्याची माहिती संघटनेचे सचिव डॉ. रेवत कांनिदे यांनी दिली.