Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

नांदेड प्रकरण : अधिष्ठातांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी खासदारांनी माफी मागावी; अन्यथा आंदोलनचा मार्डचा इशारा

banner

मुंबई :

नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये २४ तासांमध्ये २४ जणांचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्याशी गैरवर्तन करत प्रसारमाध्यमांसमोर त्यांना स्वच्छतागृहे साफ करण्यास भाग पाडले. निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने या घटनेचा तीव्र निषेध करत खासदार पाटील यांनी माफी मागावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. यामुळे कोलमडणाऱ्या रुग्णसेवेसाठी पूर्णत: शासन जबाबदार राहील असाही इशारा त्यांनी दिला आहे.

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झालेल्या २४ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय मार्डने रुग्णालयातील अनेक विभागांच्या निवासी डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करून या प्रकरणाची माहिती घेतली. यामध्ये या दुर्दैवी घटनेसाठी अनेक बाबी कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये वैद्यकीय शिक्षकांची कमतरता, वर्ग ३ आणि वर्ग ४ ची कमतरता, वैद्यकीय सेवक, एकूण मनुष्यबळ, जीवरक्षक औषधे आणि संसाधने यांचा तुटवडा असल्याचे निदर्शनास आले. असे असतानाही निवासी डॉक्टर वैद्यकीय शिक्षक हे आपले सर्वस्व पणाला लावून रुग्णसेवा करत आहेत. औषधे व गंभीर संसाधनाचा तुटवडा हा फक्त नांदेड रुग्णालयापुरता मर्यादित नसून तो राज्यातील उर्वरित रुग्णालयांमध्येही आहे. याचा विचार न करता खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड रुग्णालयाच्या अधिष्ठातांना शिवीगाळ करून गैरवर्तन करत त्यांना अपमानित केले. तसेच त्यांना जाणीवपूर्वक प्रसारमाध्यमांसमोर महाविद्यालयाच्या आवारातील स्वच्छतागृहे साफ करण्यास भाग पाडले गेले. घटनेचे मूळ कारण शोधण्यासाठी योग्य तपासाची वाट न पाहता अधिष्ठात्यांना दिलेली अपमानास्पद वागणुकीचा केंद्रीय मार्डकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. तसेच खासदार पाटील यांनी शिवीगाळ करत दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल बिनशर्त माफी मागावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टर आंदोलन करतील असा इशारा केंद्रीय मार्डकडून देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडल्यास त्याला पूर्णत: शासन जबाबदार राहील असेही मार्डकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या अपयशाचा डॉक्टरांना बळी बनवू नका

रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही प्रशासनाच्या अपयशासाठी डॉक्टर व वैद्यकीय शिक्षकांना जबाबदार धरण्यात येत आहे. तसेच त्यांना खालच्या दर्जाची वागणूक देऊन त्यांचा सार्वजनिक अपमान करण्यात येत असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक निराश झाले आहेत. तसेच घटनेनंतर डॉक्टर हताश झाले आहेत. प्रशासनाच्या अपयशासाठी डॉक्टरांना बळीचा बकरा बनवण्याऐवजी राज्यभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जीवरक्षक औषधे, संसाधने आणि मनुष्यबळाच्या कमतरतेची दूर करण्याची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, अशी विनंती मार्डकडून करण्यात आली आहे.

 

Related posts

आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वे सोडणार विशेष रेल्वे गाड्या

सीईटी सेलच्या सुसंवाद मेळाव्याला विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Voice of Eastern

कोकणातील आपत्तीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणार

Voice of Eastern

Leave a Comment