मुंबई :
भारतीय आयुर्विमा महामंडळ आयोजित ४९ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा दादर येथील हालारी विसा ओसवाल समाज हॉल येथे सुरु आहे. साखळी स्पर्धेतील वयक्तिक कामगिरीच्या आधारे सांघिक गटाच्या सामन्यांना सुरुवात झाली. आंतर संस्था सांघिक महिला गटातील उपांत्य फेरीच्या सामन्यात पेट्रोलियम बोर्डाने सेंट्रल सिव्हिल स्पोर्ट्स बोर्डाचा २-१ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली तर पुरुष गटात पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाने जैन इरिगेशनला ३-० असे हरवून अंतिम फेरी गाठली.
महिलांमध्ये सेंट्रल स्पोर्ट्स बोर्डाच्या के नागजोतीने पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाच्या माजी विजेत्या रश्मी कुमारीचा २५-१७, १८-१३ असा सहज दोन सेटमध्ये पराभव केला. तर परंतु पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाच्या काजल कुमारीने आर. विनिताला १९-१२, २५-५ असे हरवून बरोबरी साधली. मात्र पेट्रोलियम बोर्डाच्या एस इलावझकी आणि परिमला देवी जोडीने सेंट्रल सिव्हिल बोर्डाच्या अनुक्रमे आर. विनिता व गायत्री एस व समिधा जाधव जोडीला १९-१२, २५-५ व २५-४, २५-५ असे पराभूत केल्याने महिलांच्या गटात पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाने अंतिम फेरीत प्रवेश केला.
ओएनजीसी, इंडियन ऑइल, युनियन बँक, हिंदुस्थान पेट्रोलियम व बँक ऑफ इंडियासह पुरस्कृत स्पर्धेतील पुरुष सांघिक गटात उपांत्य लढतीत पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाने गत विजेत्या जैन इरिगेशन संघाला ३-० अशी धूळ चारली. अनुक्रमे के. श्रीनिवासने जैन इरिगेशनच्या योगेश धोंगडेला २५-१२, २५-१८ असे हरविले. महम्मद घुफ्रानने अभिजित त्रीपनकरला २५-३, ३-१८ व २१-८ अशी अटीतटीच्या लढतीत मात केली. यातील दुहेरीच्या सामन्यात योगेश परदेशी व रमेश बाबू जोडीने पंकज पवार व अनिल मुंढे जोडीला २५-१०, २०-१५ असे डोके वर काढू दिले नाही.
दुसरीकडे पुरुषांच्या आंतर संस्था सांघिक सामन्यात प्रशांत मोरे व झहीर पाशाच्या जोरावर रिझर्व्ह बँकेने सेंट्रल स्पोर्ट्स बोर्डाला ३-० असे हरवून अंतिम फेरी गाठली. तर महिलांच्या सांघिक गटातही रिझर्व्ह बँकेने भारतीय आयुर्विमा महामंडळाला २-१ असे हरवून अंतिम फेरी गाठली. यात रिझर्व्ह बँकेच्या कविता सोमांचीने एस अपूर्वावर २३-८, २२-३ असा विजय मिळवून संघासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावली.