Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

डोंबिवली शहर भयमुक्त करण्यासाठी राष्ट्रवादी करणार धरणे आंदोलन

banner

डोंबिवली :

राज्यात गुन्हेगारीमध्ये नागपूर हे शहर अग्रेसर समजले जात असे, मात्र सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेले डोंबिवलीने आता नागपूरला मागे टाकत गुन्हेगारीचे शहर म्हणून नावारूपाला येत आहे. गुंडांना सरकारी अभय मिळत असल्याने गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही. त्यामुळे हे शहर भयमुक्त होण्यासाठी डोंबिवलीत मंगळवारी इंदिरा चौकात राष्ट्रवादी धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत प्रवक्ते महेश तपासे, अ‍ॅड ब्रम्हा माळी, नंदू धुळे-मालवणकर, निरंजन भोसले, समीर गुधाटे, राजेंद्र नांदोस्कर, सुनिल फळदेसाई, सुरेय्या पटेल आणि २२ दिवसांपूर्वी रेल्वेखाली आत्महत्या केलेले केबल व्यावसायिक प्रल्हाद पाटील यांची पत्नी सपना पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सपना पाटील म्हणल्या की, माझ्या पतीचा अनेक वर्षापासून केबल व्यवसाय होता. मात्र तो व्यवसाय बंद करण्यासाठी त्यांना गावातील गुंड व भाजपचा पदाधिकारी संदीप माळी वारंवार मानसिक त्रास देत होता. याप्रकरणी माझे पती अनेक वेळेला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले असता पोलीस तक्रार घेत नव्हते. त्यामुळे अखेर त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलवर एक व्हिडिओ तयार केला. त्यामध्ये त्यांना कोणी व कसा त्रास दिला हे सांगितले आहे. त्यामध्ये भोपर गावतील संदीप माळी याच्यासह १५ जणांची नावे आहेत. हा व्हिडीओ चित्रित केल्यावर माझ्या पतीने रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी पतीने काढलेला व्हिडीओ म्हणजे मृत्यूपूर्व जबाब आहे, हा जबाव न्यायालयात खरा मानला जातो, मात्र २२ दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही. अद्याप त्यांना अटक झाली नाही. अखेर न्याय मिळावा म्हणून त्यांनी राष्ट्रवादीकडे धाव घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.

पोलीस तपास निपक्षपाती झाला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. एका महिलेला न्याय मिळत नाही, याचा या सरकारने विचार केला पाहिजे. सपना पाटील यांना पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी तपासे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. ब्रम्हा माळी यांच्या जिममध्ये शिरून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. अशा प्रकारे सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात आहेत. याआधी नागपूर हे गुन्हेगारीत पुढे होते. डोंबिवली शहरातील गुन्हेगारी थांबली पाहिजे. हे शहर भयमुक्त होण्यासाठी आणि नागरिकांना जागे करण्यासाठी डोंबिवलीत ४ ऑक्टोबर रोजी इंदिरा चौकात राष्ट्रवादी अनेक कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन करणार आहे. या आंदोलनात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्ष विद्या चव्हाण हेही सहभागी होणार आहेत. यानंतरही पोलीस यंत्रणेने आपले काम व्यवथित केले नाही तर राष्ट्रवादीकडून जेलभरो आंदोलन केले जाईल, असा इशारा तपासे यांनी दिला.

Related posts

आंतरराष्ट्रीय खगोल ऑलिम्पीयाडमध्ये भारत अव्वल

Voice of Eastern

परीक्षा केद्र तालुका स्तरावर उपलब्ध करण्याचे सीईटी सेल समोर आव्हान

रामदास आठवले, राजू शेट्टी यांची भूमिका असलेला ‘राष्ट्र’ २६ ऑगस्टला झळकणार

Leave a Comment