मुंबई
देशातील प्रज्ञावान विद्यार्थी शोधून त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करण्यासाठी दरवर्षी नवी दिल्लीतील राष्ट्रीय शैक्षणिक संशाधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एनसीईआरटी) राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेंतर्गत दरवर्षी दोन हजार विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी महत्त्वाच्या असलेल्या या परीक्षेचे वेळापत्रक केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यस्तरावरील ही परीक्षा १६ जानेवारी २०२२ ला होणार आहे. तर राष्ट्रीयस्तरावरील परीक्षा १२ जून २०२२ ला होणार आहे.
इयत्ता दहावीसाठी २०१२-१३ पासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येत आहे. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ही दोन टप्प्यात होत असून, पहिल्या टप्प्यात राज्यस्तर व दुसर्या टप्प्यात राष्ट्रीयस्तरावर ही परीक्षा होते. राज्यस्तरावर १०० गुणांची बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी असे दोन पेपर घेण्यात येतात. राज्यस्तर परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीयस्तर परीक्षेला बसता येते. गतवर्षी महाराष्ट्रातून राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी ७४४ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. ही परीक्षा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेन ही परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत १५० रुपये शुल्क भरून ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. तर विलंब शुल्क २७५ रुपयांसह १ ते ७ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. अतिविलंब शुल्क ४०० रुपयांसह ८ ते १३ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रासह अन्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्यस्तर परीक्षा १६ जानेवारीला सकाळी १०.३० ते १२.३० आणि १.३० ते ३.३० दरम्यान होणार आहे.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेंतर्गत प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते. मूलभूत विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि वाणिज्य यामधील पीएच.डी. पदवी प्राप्त करेपर्यंत ही शिष्यवृत्ती मिळते. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन आणि विधीयामधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती फक्त पदव्युत्तर पदवीपर्यंत देण्यात येते. देशात इयत्ता १० वी या इयत्तेसाठी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे दरवर्षी दोन हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या प्रदान करण्यात येतात. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून देणार्या या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी नोंदणी करण्याचे वेळापत्रक आणि परीक्षेचे वेळापत्रक एनसीईआरटीकडून जाहीर करण्यात आले आहे.