मुंबई :
कोरोना संक्रमणामुळे स्थगित करण्यात आलेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा जनता दरबार आता ४ एप्रिल २०२२ पासून सुरू करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार पक्षाने जनता दरबाराचा उपक्रम सुरु केला होता. मात्र कोरोनाचे सावट आल्यापासून सुरक्षेच्यादृष्टीने हा उपक्रम काही काळ बंद ठेवण्यात आला होता. राज्यात कोरोना संक्रमण बऱ्याच अंशी आटोक्यात आले आहे. त्यामुळे राज्यात एक एप्रिलपासून नियमांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतला आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना दिली.
नियमांच्या शिथिलतेमुळे आता राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे जनता दरबारचा उपक्रम पुन्हा सुरु करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे असे अजित पवार म्हणाले. सोमवार ते शुक्रवार या काळात पक्षाचे मंत्री जनतेच्या तसेच कार्यकर्त्यांच्या कामांसाठी उपस्थित राहतील असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.