मुंबई
कोरोनामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योगांमध्ये ऑक्टोबर २०२१ मध्ये १९ हजार ६४८ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलच्या माध्यमातून २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून दिला होता. तर चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर अखेर १ लाख ४७ हजार ८८१ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला असल्याचे मलिक यांनी सांगितले. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक ७६८६ तरुणांना रोजगार मिळाला आहे. त्याखालोखाल पुणे (४७४२), नाशिक (४००४) या शहरांमधील बेरोजगारांना रोजगार मिळाले आहेत. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करतात. या पोर्टलवर आतापर्यंत ९१ हजार ९०८ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे मलिक यांनी सांगितले.
विभागनिहाय करण्यात आलेली नोंदणी
विभाग नोंदणी नोकरी लागलेले तरूण
मुंबई ११६९५ ७६८६
नाशिक ९३९३ ४००४
पुणे १३९८४ ४७४२
औरंगाबाद ८६७२ २३७४
अमरावती ५०७१ ४८४
नागपूर ३०४७ ३५८
एकूण ५१८६२ १९६४८