मुंबई:
मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकामुळे घरातून पळून गेलेल्या दोन अल्पवयीन मुली सुखरूप घरी पोहोचल्या आहेत. गायक बनण्यासाठी मध्यप्रदेशमधील भोपाळमधून एक अल्पवयीन मुलगी घर सोडून मुंबईत आली होती. तर अभ्यासावरून आई रागवल्याने ट्रॉम्बे येथून एक अल्पवयीन मुलगी घर सोडून पळून गेली होती. मात्र निर्भया पथकाने तत्परता दाखवत घेतलेल्या शोध मोहीमेमुळे या दोन्ही मुलींना सुखरूप घरी पोहोचवण्यात यश आले. या कामगिरीबाबत निर्भया पथकातील महिला अधिकार्यासह कर्मचार्यांचे वरिष्ठ अधिकार्यांकडून कौतूक होत आहे.
मुंबईमध्ये सर्वांची स्वप्ने पूर्ण होतात. त्यामुळे मला गायक बनण्यासाठी मुंबईला गेले पाहिजे या ध्येयाने झपाटलेल्या मध्य प्रदेशमधील भोपाळमधून एक अल्पवयीन मुलगी गायक होण्यासाठी ११ नोव्हेंबरला मुंबईत आली. या मुलीच्या गायक होण्याला आई-वडिल, भाऊ आणि बहिणीचा विरोध होता. मात्र ती आपल्या निर्णयावर ठाम होती. घरच्यांच्या विरोधाला कंटाळून तिने घर सोडण्याचा निर्णय घेत १० नोव्हेंबरला घरातून पळून सायंकाळी पंजाब मेलने मुंबईत आली. मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर कुठे जायचे, राहायचे कुठे, जवळ पैसे नाही, यामुळे ती प्रंचड घाबरली. त्यामुळे ती रेल्वे स्थानकाजवळ रडत बसली. हा प्रकार एका दक्ष नागरिकाच्या निदर्शनास येताच त्याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ११ नोव्हेंबरच्या सायंकाळी साडेसात वाजता ही माहिती दिली. त्याचवेळी टिळकनगर परिसरात गस्त घालत असलेले निर्भया पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तिचा शोध घेत तिला ताब्यात घेतले. तिची वारंवार विचारणा करुनही ती काहीच बोलत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी तिला धीर देत तिची विचारपूस केली असता तिने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तिच्या वडिलांना संपर्क साधला असता त्यांनी ती त्यांचीच मुलगी असल्याचे सांगितले. तिची हरवल्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानंतर दुसर्या दिवशी तिचे वडिल आणि काका मुंबईत आले. त्यांच्याकडे या मुलीचा ताबा देण्यात आला.
ट्रॉम्बे येथे राहणारी एका अल्पवयीन मुलीला तिची आई अभ्यासावरून रागावल्याने तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १७ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता तिने आईनला आपण प्रार्थनेसाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या कुटुंबियासह स्थानिकांनी तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे भयभीत झालेल्या तिच्या कुटुंबियांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत मुलीचा शोध सुरु केला होता. निर्भया पथकासह गुंडाविरोधी पथकाने या मुलीचा चिताकॅम्प, मानखुर्द, भीमनगर परिसरात शोध सुरु केला. शोधमोहीम सुरु असतानाच ही मुलगी मानखुर्द रेल्वे स्थानकात पोलिसांना सापडली. तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून तिची पोलिसांनी चौकशी केली. यावेळी तिने अभ्यासाच्या नावाने ती इंटाग्रामवर मित्र-मैत्रिणीशी चॅट करते म्हणून तिची आई तिच्यावर रागावली होती. त्याचा राग आल्याने ती प्रार्थनेसाठी जाते असे सांगून घरातून निघून गेली. तिच्याबाबतीत काहीही आक्षेपार्ह घडले नसल्याचे तपासात उघडकीस आले. तिच्या कबुलीनंतर तिला तिच्या पालकांकडे सोपविण्यात आले होते. दोन्ही अल्पवयीन मुलींच्या पालकांनी त्यांच्या मुली सुखरुप सापडल्याने पोलिसांचे आभार व्यक्त केले.