मुंबई :
राज्यात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात सोमवारी ओमायक्रॉनचे आणखी दोन नवे रुग्ण सापडले. पुणे आणि लातूरमधील हे दोन्ही रुग्ण आहेत. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन बधितांची संख्या २० वर पोहोचली आहे.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात पुणे आणि लातूर येथे प्रत्येकी एक ओमायक्रॉन बाधित रुग्ण सापडला आहे. दोन्ही रुग्ण लक्षणेविरहित असून पुण्यामध्ये ३९ वर्षाची महिला तर लातूरमध्ये ३३ वर्षाचा पुरुषाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. हे दोन्ही रुग्ण दुबईहून आलेले असून दोघांच्याही संपर्कात असलेल्या व्यक्तीचा कोव्हीड अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या दोघेही विलगीकरणात असून त्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
राज्यातील ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबई ५, पिंपरी चिंचवड १०, पुणे मनपा २ कल्याण डोंबिवली १ नागपूर १ आणि लातूर १ यांचा समावेश आहे. राज्यात सापडलेल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांपैकी ९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.