गिरिप्रेमी व गार्डीयन गिरिप्रेमी इन्स्टिट्युट ऑफ माऊंटेनियरींग यांच्या संयुक्त विद्यमाने ११ डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ अभिनव साजरा करण्याचे ठरविले आहे. या अंतर्गत पुण्यातील ११ टेकड्यांवर माऊंटन रन आणि माऊंटन वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये पिंपरी-चिंचवड माऊंटेनियरींग क्लब, निसर्ग मित्र, विद्या व्हॅली शाळा, माऊंट एज डव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेलस्, निसर्गराजा, थिंक ग्रीन, माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण महामंडळ (पिंपरी-चिंचवड), लव्ह-केयर-शेयर फाउंडेशन, वीरवैद्य अकॅडमी, वसुंधरा अभियान, बाणेर यांसारख्या विविध संस्थांचा विशेष सहभाग असेल.
तळजाई टेकडी (हिंगणे कॅनल), तळजाई टेकडी (सहकार नगर), तळजाई टेकडी (वाघजाई मंदिर), वेताळ टेकडी (पत्रकार नगर), वेताळ टेकडी (ए आर ए आय पार्किंग), म्हातोबा टेकडी (परमहंस नगर), हनुमान टेकडी (फर्ग्युसन महाविद्यालय), घोरडेश्र्वर टेकडी (देहूरोड), बाणेर टेकडी (बाणेर), खंडोबा टेकडी (धायरी), पाषाण टेकडी (पाषाण) या ११ टेकड्यांवर संस्थेचे ११ एव्हरेस्ट शिखरवीर ‘माऊंटन रन’चे प्रतिनिधीत्व करतील तर संस्थेचे ११ ज्येष्ठ व अनुभवी गिर्यारोहक ‘माऊंटन वॉक’चे प्रतिनिधीत्व करतील. या दोन्ही रन आणि वॉकचे अंतर प्रत्येकी ३ किमी असेल. ८ वर्षांवरील कोणालाही यामध्ये निःशुल्क सहभाग घेता येईल. सकाळी ६.३० ते ७.३० या दरम्यान ‘माऊंटन रन’ आणि ‘माऊंटन वॉक’ होईल व त्यानंतर ज्येष्ठ गिर्यारोहक तसेच सर्व निसर्गप्रेमी पर्वतपुजन करतील.
१९ वा ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा करण्याकरिता गिरिप्रेमी संस्थेतर्फे सर्व पर्वतप्रेमी, निसर्गप्रेमी, साहसप्रेमी आणि गिर्यारोहकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी http://surl.li/awuif या वेबसाईटला भेट द्या
११ डिसेंबर- आंतरराष्ट्रीय पर्वत दिन
जगभरामध्ये ११ डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ म्हणून साजरा केला जातो. जगातील एकूण लोकसंख्येच्या एक सप्तमांश लोकसंख्या डोंगराच्या सान्निध्यात राहते, तसेच उर्वरित लोकसंख्या अप्रत्यक्षपणे डोंगर परिसराशी निगडीत असणार्या नैसर्गिक स्त्रोतांवर अवलंबून आहे. म्हणूनच या विषयासंदर्भात अधिकाधिक जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी ‘संयुक्त राष्ट्रसंघ’ या दिवसाशी संबधित एक विषय निवडते. यावर्षी ‘संयुक्त राष्ट्रासंघा’च्या अन्न व कृषी संघटन विभागाने ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिना’साठी ‘पर्वतांमधील शाश्वत पर्यटन’ हा विषय निवडला आहे. त्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी व डोंगर- पर्वतांचे महत्व ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी गिरिप्रेमी तर्फे या कार्यक्रमांचे खास आयोजन करण्यात आले आहे.