मुंबई:
मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या पेट परीक्षेचे अर्ज दाखल करण्यास आज ६ ऑक्टोबर पासून सुरूवात करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना २६ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करता येणार आहेत. परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
मानव्यविद्या शाखेतील २६ विषय, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतील ७ विषय, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील ३० विषय आणि आंतरविद्याशाखेतील १६ विषय अशा एकूण ७९ विषयांसाठी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मार्च २०२१ मध्ये झालेल्या ऑनलाईन पेट परीक्षेसाठी १३ हजार ४५२ एवढे विद्यार्थी प्रवेशित झाले होते.