मुंबई :
ऑनलाईन व्यवहारामध्ये आपला ओटीपी क्रमांक कोणालाही सांगू नका अशा सूचना रिझर्व्ह बँकेसह सर्वच बँकांकडून देण्यात येते. मात्र जोगेश्वरीमध्ये एका महिलेने आपला ओटीपी क्रमांक न सांगताही तिच्या खात्यातून साडेचार लाख ट्रान्सफर झाले. या घटनेने महिलेला धक्काच बसला आहे. त्यामुळे ओटीपी क्रमांक न सांगतानही बँक खात्यावर डल्ला पडू शकतो. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारांमध्ये अधिक सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
अंधेरी येथे आपल्या पतीसोबत राहत असलेल्या २४ वर्षीय महिला गोरेगाव येथील विमा कंपनीत शाखा मॅनेजर म्हणून काम करत आहे. तिचे एका खाजगी बँकेत बचत खाते असून त्यात तिने २४ लाख रुपयांची बचत केली होती. त्यातील २० आणि तीन लाख रुपयांची तिला ठेवी ठेवायच्या होत्या. याबाबत तिने बँकेला माहिती दिल्यावर बँकेने तिच्या घरी एक कर्मचारी येईल असे सांगितले. त्यानंतर गुरुवारी १० मार्चला व्हिक्टर लेवीस हा कर्मचारी तिच्या घरी फिक्स डिपॉझिटचे फॉर्म घेऊन आला. यावेळी तिने त्याला २० आणि तीन लाखांचे फिक्स डिपॉझिट करण्याचे फॉर्म भरुन दिले. दुसर्या दिवशी तिला २० लाख रुपये फिक्स डिपॉझिट झाल्याचा मॅसेज आला. या मॅसेजसोबत तिचे बँक खाते नवीन डिव्हाईसमध्ये लॉगिन झाल्याचा मॅसेजही आला. त्यामुळे तिने बँकेच्या कस्टमर केअरला फोन करुन ही माहिती सांगितली. काही वेळाने बँक मॅनेजरने तिला फोन करुन तिच्या बँक खात्याबाबत काही तक्रार असून तिने ओटीपी क्रमांक कोणालाही शेअर करु नये असे सांगितले. मॅनेजरशी बोलत असतानाच तिच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार झालेे. तिच्या खात्यातून पैसे डेबिट होत होते. काही वेळानंतर तिच्या बँक खात्यातून साडेचार लाख रुपये ट्रान्स्फर झाले. या घटनेने तिला धक्काच बसला आणि तिने बँकेत फोन करुन तिचे खाते ब्लॉक केले. तिने कोणालाही तिच्या बँक खात्याची माहिती दिली नव्हती, ओटीपी क्रमांक शेअर केला नव्हता. तरीही तिच्या बँक खात्यातून साडेचार लाखांचा अपहार झाला होता. या घटनेनंतर तिने जोगेश्वरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.