Voice of Eastern

मुंबई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या ऑनलाईन शिक्षण राज्यात ऑनलाईन विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवण्यास कारणीभूत ठरले आहे. शैक्षणिक संस्थांपासून दूर राहत असलेल्या विद्यार्थ्यांना नियमितपणे विद्यापीठात किंवा महाविद्यालयात उपस्थित राहणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग सुकर व्हावा या उद्देशाने राज्यामध्ये ऑनलाईन विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील तसेच महाविद्यालयांपासून दूर राहणार्‍या विद्यार्थ्यांची निवासव्यवस्था, प्रवास खर्च कमी होऊन त्यांना घरी बसून शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे आता उच्च शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या आवाक्यात येणार आहे.

देशामध्ये कोविड १९च्या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पारंपरिक सार्वजनिक विद्यापीठे, महाविद्यालये इत्यादी शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पोर्टल्स अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात ऑनलाईन विद्यापीठ सुरू केल्यास त्याचा शिक्षण संस्थांपासून दूर अंतरावर राहणार्‍या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. ऑनलाईन विद्यापीठात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नसल्याने त्यांचा निवासव्यवस्था व प्रवास खर्चात कपात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांने ऑनलाईन शिक्षण परवडणारे असून, विद्यार्थ्यांच्या जीवनमानात ऑनलाईन विद्यापीठांच्या स्थापनेमुळे महत्त्वपूर्ण बदल घडण्यास मदत होणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणातही ऑनलाईन व डिजीटल शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे. ही बाब विचारात घेऊन विद्यार्थ्यांना माफक दरात ऑनलाईन किंवा डिजीटल शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी राज्य सरकारकडून समिती गठीत करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आर. के. शेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली असून, यामध्ये पुणे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष रमन प्रित, नेव्हिल वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. आनंदराव दादस, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेंटचे विभाग प्रमुख डॉ. मनीष गोडसे, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे अधिष्ठाता डॉ. अंगप्पा गुनासेकरण, नागपूर आयआयएमचे संचालक भिमराय मेत्री, संबळपूर आयआयएमचे संचालक महादेव जयस्वाल, हेवार्ड बिझिनेस स्कूलचे सुरज श्रीनिवास, मुंबई विद्यापीठाचे आयटी प्रमुख श्रीवरमंगई रामानुजम आणि तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक यांची समितीमध्ये निवड करण्यात आली आहे. ही समिती सहा महिन्यांत अहवाल सादर करणार आहे.

या बाबींचा होणार विचार

  • प्रगत देशांमध्ये स्थापन ऑनलाईन विद्यापीठांचा अभ्यास करणार
  • अन्य राज्यातील ऑनलाईन विद्यापीठांची रचना, कार्यपद्धतीची माहिती
  • मूलभूत आवश्यक सुविधा, मनुष्यबळ, साधन सामग्री व खर्च याची माहिती
  • शिक्षक, कर्मचारी यांचे गुणवत्तेचे निकष निश्चित करणे
  • अभ्यासक्रम, परीक्षा, निकाल, पदवीबाबत अभ्यास करणे
  • शिक्षणाची वेळ, कालावधी, शुल्काच्या शिफारशी
    प्रशासकीय व्यवस्थापन कसे करावे याचा तपशील

Related posts

डोंबिवलीमध्ये उड्डाणपुलावरून मनसे व शिंदे गटामध्ये होर्डिंग्ज वॉर

‘फास’मध्ये होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष

५ अखिल भारतीय आमंत्रित कॅरम स्पर्धा १५ ते १७ जुलैला होणार

Leave a Comment