मुंबई :
महापालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग पुनर्रचनेवर भाजपकडून जोरदार टीका झाली असताना २३६ प्रभागांसाठी फक्त १०० हरकती व सूचना दाखल झाल्या आहेत. या हरकती व सूचनांवर निवडणूक आयोगाकडून नियुक्त केलेल्या समितीसमोर २२ फेब्रुवारीपासून सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यासंदर्भातील अहवाल २ मार्चला निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे.
मुंबईमध्ये लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेकडून करण्यात आलेल्या पुनर्रचनेनुसार मुंबईमध्ये ९ प्रभागांची वाढ झाली आहे. त्यामुळे प्रभाग संख्या २२७ वरून २३६ वर पोहोचली आहे. नव्या प्रभाग रचनेचा मसुदा महापालिकेच्या संकेतस्थळावर १ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावर पालिकेकडून १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यानुसार राजकीय कार्यकर्ते, माजी नगरसेवक आणि विविध सामाजिक संस्था यांच्याकडून १०० हरकती व सूचना आल्या आहेत. विशेष म्हणजे या प्रभाग रचनेला भाजपकडून विरोध करण्यात आला होता. आम्ही प्रभाग रचनेविरोधात हरकती व सूचना मांडणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत होते. त्या तुलनेत हरकती व सूचना फार कमी आल्याचे दिसून येत आहे.
काहीजणांनी प्रभागात केलेले बदल पूर्ववत करावेत. प्रभागातील काही भाग वगळण्यात यावा. मर्जीतील मतदार असलेला भाग तसाच ठेवावा अशाप्रकारे हरकती व सूचना केल्याचे समजते. हरकती व सूचनावर सुनावणीसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव, कोंकण विभागीय आयुक्त, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांची समिती नियुक्त केली आहे