मुंबई :
नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये २४ तासांमध्ये २४ मृत्यू झाल्याच्या घटनेला जीवरक्षक औषधांचा तुटवडा कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून राज्यातील रुग्णालयातील औषध तुटवड्याचा मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांसाठी औषध खरेदी करत असलेल्या हाफकिन खरेदी कक्षामार्फत मागील सहा महिन्यांमध्ये फक्त १३ खरेदीचे आदेश काढण्यात आले आहेत, तर नव्याने स्थापन केलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाने आतापर्यंत फक्त १० निविदा काढल्या आहेत.
राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांना औषधे पुरविण्याची जबाबदारी ही हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळांतर्गत असलेल्या खरेदी कक्षाकडे होती. राज्यातील औषध तुटवड्यानुसार अधिकाधिक औषध खरेदी होणे आवश्यक असतानाही मागील तीन वर्षांमध्ये खरेद कक्षाकडून काढलेल्या निविदांमध्ये लक्षणीय घट झालेली आहे. २०२१ – २२ मध्ये २२०३ निविदा काढण्यात आल्या होत्या. तर २०२२-२३ मध्ये यामध्ये निम्म्याने घट होऊन १२६५ निविदा काढण्यात आल्या होत्या. तर एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या सहा महिन्यांच्या कालावधीतमध्ये फक्त १३ निविदा काढल्या आहेत. यामध्येही ॲमॉक्सिसीलीन २५० ग्रॅम आणि ५०० ग्रॅम या एकाच औषधाची निविदा काढली आहे. तर उर्वरित सर्व निविदा या वैद्यकीय साहित्य आणि यंत्रणा खरेदीच्या आहेत. मागील वर्षांमध्ये केलेल्या मागणीनुसार ही खरेदी केली असून, २०२२-२३ या वर्षातील औषध खरेदीसाठी ११२ कोटी रुपये मंजूर झाले असताना सरकारकडून फक्त ५० कोटी रुपयेच वर्ग झाले आहेत, त्यामुळे कक्षाला औषध खरेदी करणे जिकरीचे झाले आहे. निधी वेळेत मिळत नसल्याने वितरकांची देयके थकली असल्याने ते औषध पुरवठा करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे नवीन निविदा प्रक्रियेसाठी वितरक पुढे येत नसल्याने औषधांचा तुटवडा निर्माण हाेत असल्याचे औषध खरेदी कक्षातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
खरेदी कक्षातून अनागोंदी कारभारामुळे मागील काही वर्षांपासून राज्यामध्ये औषधांचा तुटवडा कायम होता. त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण स्थापन करून त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली. या प्राधिकरणाने खरेदी कक्षाच्या कोणत्याही व्यवहाराची जबाबदारी न घेता २०२३ -२४ पासून नव्याने खरेदी प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. प्राधिकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत अवघ्या १० ते १२ निविदा प्राधिकरणाकडून काढण्यात आल्या आहेत. मात्र खरेदी कक्षाच्या अनुभवामुळे वितरकांकडून या निविदांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने या निविदा अद्यापही प्रक्रियेमध्ये आहेत.
औषध खरेदी करण्यासंदर्भातील महाराष्ट्र सरकारचे धोरण हे देशातील खालच्या पातळीवर आहे. हे फारच वाईट असून, औषध खरेदीचा स्तर सुधारण्यासाठी एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वाखाली कृती दल स्थापन करण्याची आवश्यकता आहे. औषधांच्या तुटवड्यामुळे नांदेडमध्ये मुले दगावल्याने हे प्रशासनाचे अपयश आहे.
– अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशन