मुंबई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षेला ४ मार्चपासून ऑफलाईन पद्धतीने सुरूवात होत आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परीक्षा केंद्रांवर कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. त्यानुसार परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गामध्ये २५ विद्यार्थ्यांना बसवण्यात येणार आहे. एका वर्गासाठी २५ प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र सिलबंद पाकिट याप्रमाणे पाकिटे देण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून घेण्यात आला आहे.
हे पण वाचा : HSC Exam : बारावीची परीक्षा उद्यापासून सुरू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बारावीच्या परीक्षा नेहमीपेक्षा १५ दिवस उशीराने सुरू करण्यात येत आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर परीक्षा केंद्र किंवा उपकेंद्र देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू करण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येणार आहे. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर प्रत्येक वर्गांसाठी सर्व विषयांच्या २५ प्रश्नपत्रिकांचा स्वतंत्र सिलबंद पाकिट देण्यात येणार आहे. २५ प्रश्नपत्रिकांचे सिलबंद पाकिट पर्यवेक्षक आपल्या परीक्षा कक्षातील दोन परीक्षार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन उघडतील. त्यामुळे प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखण्यात येणार आहे. उत्तरपत्रिका व पुरवण्यांची अदलाबदल होऊ नये यासाठी सर्व उत्तरपत्रिका व पुरवण्यांवर बारकोडची छपाई करण्यात आलेली आहे.