मुंबई :
कर्करोगासाठी मुंबईतील टाटा रुग्णालय हे ओळखले जात असताना मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातही कर्करोग रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आल्याने रुग्णांना दिलासा मिळाला होता. मात्र आता आणखी एक पुढचे पाऊल टाकत नायर रुग्णालयात तोंडावरील कर्करोगावरील उपचार सुरू करण्याचा निर्धार मुंबई महापालिका रुग्णालयांच्या संचालिका आणि नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.नीलम अंद्राडे यांनी केला आहे. त्यासाठी नायर रुग्णालयामध्ये आवश्यक यंत्रणा उभारण्याबरोबरच पायाभूत सुविधासंदर्भात प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहेत.
तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.या रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळाल्यास त्यांचे आयुष्य सुकर होण्यास मदत होणार आहे. सध्या मुंबईमध्ये टाटा रुग्णालयामध्ये तोंडाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार होत असले तरी तेथे प्रचंड ताण आहे. त्यामुळे मुंबईतील तोंडाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांना उत्तम उपचार मिळावेत यासाठी मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णायालयात विशेष कक्ष सुरू करण्याचे सुतोवाच मुंबई महापालिका रुग्णालयांच्या संचालिका डॉ.नीलम अंद्राडे यांनी केले आहे. नायर रुग्णालयामध्ये कर्करोग रुग्णांवर किमोथेरेपी करण्यात येते. नायर रुग्णालयामध्ये कर्करोग रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध आहे, तसेच या रुग्णांवर उपचारासाठी नायरमध्ये विशेष इमारतही बांधण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील तोंडाच्या कर्करोगाने बाधित असलेल्या रुग्णांवर नायरमध्ये उपचार करणे शक्य होणार आहे. नायर रुग्णालयामध्ये किमोथेरपीची सुविधा उपलब्ध असल्याने रेडिओथेरपी, कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी सर्जरी करणे यांच्यासाठी तरतूद करावी लागणार आहे, या पायाभूत सुविधा नायर वैद्यकीय रुग्णालयात उपलब्ध झाल्यास त्याचा रुग्णांना फायदा होणार आहे. त्यामुळे नायर वैद्यकीय रुग्णालयात मुख कर्करोगावर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष सुरू करण्याचा निर्धार असून, त्यासाठी मी पालिका प्रशासनाकडे प्रस्तावही पाठवला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास त्यावर तातडीने काम करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिका रुग्णालयांच्या संचालिका डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली.