मुंबई :
शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी मुंबईमध्ये ८ एप्रिल २०२२ पर्यंत जमावबंदी आदेश जारी केले आहेत.
आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, मोर्चा काढणे, जमाव करून ध्वनिवर्धकाचा, संगीत बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घातला आहे. विवाह समारंभ, विवाहप्रथा, अन्य समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था व संघटनांच्या वैधानिक बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम यांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.
नाट्यगृहे, चित्रपटगृहे तसेच मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, सरकारी, निमसरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, अन्य शैक्षणिक संस्था, दुकाने, कारखाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावाला वगळले आहे. जमाव करण्यास तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलीसांनी परवानगी दिली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे मुंबई पोलीस उपायुक्त (अभियान) यांच्या आदेशात नमुद केले आहे.
ड्रोन, खाजगी हेलीकॉप्टर उडविण्यास प्रतिबंध
मुंबई हद्दीत ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॅंग ग्लायडर्स, हॉट एअर बलून, खाजगी हेलीकॉप्टर उड्डाणाला ८ एप्रिल २०२२ पर्यंत प्रतिबंध करण्याचे आदेश बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) संजय लाटकर यांनी जारी केले आहे.