मुंबई :
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२० हे वर्ष अवयवदानासाठी निराशाजनक ठरले होते. मात्र २०२१ मध्ये मोठ्या प्रमाणात अवयवदान करण्यात आल्याने अनेकांना जीवदान मिळाले. २०२२ या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अवघ्या काही दिवसांत दुसर्यांदा अवयवदान प्रक्रिया पार पडली. दुसर्या अवयवदानामध्ये तीन जणांना जीवदान मिळाले आहे.
मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयामध्ये मुंबईतील दुसरे अवयवदान रविवारी यशस्वीरित्या पार पडले. संजय मनोहरलाल सिसोदिया (५२) यांना २२ जानेवारीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या विविध तपासण्या केल्यावर त्यांना डॉक्टरांनी मेंदूमृत घोषीत केले. त्यानंतर सिसोदिया कुटुंबाने त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सिसोदिया यांचे एक मूत्रपिंड त्याच रुग्णालयातील एका रुग्णाला देण्यात आले. तर दुसरे मूत्रपिंड नानावटी रुग्णालय आणि यकृत हे कोकिलाबेन धीरूबाई अंबानी रुग्णालयातील एका रुग्णाला दान करण्यात आले. सिसोदिया कुटुंबियांच्या या निर्णयामुळे तीन रुग्णांना जीवदान मिळाले.
सिसोदिया हे अनेक वर्षांपासून मधुमेहाचे रुग्ण होते. त्यांच्या मेदूतील रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण झालेल्या ब्लॉकेजमुळे त्यांना एक लहानसा झटका आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यानंतर त्यांचा मेंदुमृत झाल्याची माहिती सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाचे न्यूरो सायन्स विभागाचे संचालक डॉ. अरुण शहा यांनी सांगितले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये आता सुधारणा होत असून, अवदानाच्या प्रक्रियेमध्ये वाढ हाते असल्याचे झेडटीसीसीचे जनरल सेक्रेटरी डॉ. भरत शाह यांनी सांगितले.
फार कमी वयामध्ये आमच्या वडीलांचे निधन झाले हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. परंतु आम्ही उदात्तपणे आमच्या वडीलांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. आमच्या या निर्णयाने अनेकांना प्रोत्साहन मिळेल आणि ते सुद्धा अवयवदानासाठी पुढे येऊन अनेकांचे प्राण वाचवू शकतील, अशी भावना सिसोदिया यांची मुले हर्ष व यश सिसोदिया यांनी व्यक्त केली.