विक्रोळी :
वृद्ध व्यक्तीला ह्रदयविकाराचा झटका येऊनही विक्रोळीतील महात्मा फुले रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रथमोपचार न करता त्यांना थेट राजावाडी रुग्णालयात पाठवले. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत पुन्हा अशी चूक केल्यास रुग्णालयाला टाळे ठोकू असा इशारा दिला.
०९ नोव्हेंबरला कन्नमवार नगरमधील वृद्ध लक्ष्मण रामचंद्र घाडगे (८६) यांना छातीत दुखू लागल्याने विक्रोळी पुर्व टागोरनगर येथील क्रांतीवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयात आणण्यात आले. पण रुग्णालयात त्यांचा ईसीजी व अन्य प्राथमिक तपासणी न करताच त्यांना राजावाडी रुग्णालयात जाण्यास सांगितले. तसेच त्यांना रुग्णवाहिकेची व्यवस्थाही करून दिली नाही. घाडगे यांच्या नातेवाईकांनी त्यांना राजावाडीमध्ये नेल्यावर ईसीजी व अन्य तपासणी केल्यावर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात आले.
त्यामुळे विक्रोळी विभागातील मनसे सैनिकांनी क्रांतीवीर महात्मा रुग्णालय प्रशासनाला पत्राद्वारे विनंतीवजा इशारा दिला आहे की अशी चूक पुन्हा झाल्यास आम्ही रुग्णालयाला टाळा लावू. यावेळी मनसे उप विभाग प्रमुख किसन गावकर, वार्ड क्रं ११८ चे वार्ड अध्यक्ष जयंत दांडेकर, वार्ड क्रं ११९ चे वार्ड अध्यक्ष संतोष देसाई व अनेक मनसे सैनिक उपस्थित होते.
आम्ही डॉक्टरांना ईसीजी करायला सांगितले तर त्यांनी ईसीजीची आवश्यकता नसून यांना तुम्ही राजावाडी रुग्णालयात घेऊन जा. आमच्या रुग्णाला काही झाले असते तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.