मुंबई :
लोकलमधून फुकट प्रवास करणार्या प्रवाशांविरोधात मध्ये रेल्वेकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहीमेदरम्यान महिला डब्यांमधून प्रवास केल्यामुळे १८८ जणांवर तिकिट तपासणी कर्मचार्यांसह रेल्वे संरक्षण दलाने कारवाई केली आहे. महिलांच्या डब्यातून प्रवास करणार्या प्रवाशांकडून मध्य रेल्वेने तब्बल १ लाख २८ हजार ७० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. तसेच कोरोनाच्या अनुषंगाने प्रवाशांनी मास्क परिधान करणे देखील सुनिश्चित केले. त्यानुसार मध्य रेल्वेने जानेवारीच्या पहिल्या १५ दिवसांत विनातिकीट प्रवास करणार्या ५८ हजार ३३४ जणांवर कारवाई करत २ कोटी ९४ लाखांचा दंड वसूल केला. १ एप्रिल २०२१ ते १५ जानेवारी २०२२ दरम्यान मुंबई विभागात विनातिकीट प्रवास करणार्या १० कोटी १२ लाख प्रवाशांवर कारवाई करून ५१ कोटी ३१ लाखांचा दंड वसूल केला आहे. या व्यतिरिक्त मास्क परिधान न केलेल्या ७१५ प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून दंड स्वरुपात १ कोटी ४४ लाख रुपये वसूल केले. महिला डब्यातून प्रवास करणार्या पुरुष प्रवाशांना रोखण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान १८८जणांवर कारवाई करत १ कोटी २८ लाख ७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच १४ ते १६ जानेवारीदरम्यान २३ फेरीवाल्यांना रेल्वे कायद्याच्या कलम १४४ अंतर्गत कारवाईसाठी रेल्वे सुरक्षा दलाकडे सुपूर्द करण्यात आले.